Join us
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोच्या नव्या डब्यांना मंजुरी कधी?

By admin | Updated: May 15, 2014 05:55 IST

मेट्रो लवकरच ट्रॅकवर येणार, अशी चर्चा रंगलेली असतानाच तिच्या नवीन डब्यांच्या मंजुरीचा प्रस्ताव मात्र लखनौमधील मुख्य रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडेच पडून आहे

मुंबई : मेट्रो लवकरच ट्रॅकवर येणार, अशी चर्चा रंगलेली असतानाच तिच्या नवीन डब्यांच्या मंजुरीचा प्रस्ताव मात्र लखनौमधील मुख्य रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडेच पडून आहे. त्यामुळे या डब्यांना मंजुरी मिळण्यास आणखी उशीर लागणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मेट्रोला २ मे रोजीच रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून प्रमाणपत्र देण्यात आले होते. वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर असा ११.४० किलोमीटर लांबीचा प्रकल्प आहे. ४ हजार ३२१ कोटी रुपये किंमत असणार्‍या या प्रकल्पातील मेट्रोच्या वेगाची चाचणी लखनौमधील रेल्वेच्या आरडीएसओकडून (रिसर्च डिझाइन अ‍ॅण्ड स्टॅण्डर्ड आॅर्गनायझेशन) तीन महिने घेण्यात आल्यानंतर आरडीएसओकडून त्याला प्रमाणपत्र देण्यात आले. त्यानंतर पश्चिम रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून प्रमाणपत्राची प्रतीक्षा होती. या सुरक्षा आयुक्तांकडून १८, २१, २२, २३, २५, २६ आणि २८ एप्रिल रोजी मेट्रोच्या स्थानकांची पाहणी आणि मेट्रोची पाहणी केल्यावर २ मे रोजी सुरक्षा प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रमाणपत्रानंतर मेट्रो धावण्यास आता अडथळा नसल्याचे आयुक्तांकडून सांगण्यात आले होते. फक्त रेल्वे बोर्डाकडून मेट्रोच्या नवीन डब्यांना मंजुरी घेण्याची औपचारिकताच बाकी होती. ही मंजुरी आल्यास सात दिवसांत मेट्रो सुरू करण्यात येईल, असे मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडकडूनही सांगण्यात आले होते. मेट्रोच्या नवीन डब्यांचा प्रस्ताव लखनौमधील मुख्य रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडूनच रेल्वे बोर्डाकडे जाणार होता. त्यानंतरच रेल्वे बोर्डाकडून त्याला परवानगी मिळणार होती. मात्र, हा प्रस्ताव मुख्य रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडेच पडून असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्याला मंजुरी मिळालेली नसून आठवडाभरात मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबाबत, पश्चिम रेल्वे सुरक्षा आयुक्तांनाही विचारण्यात आले़तेव्हा,नवीन डब्यांच्या मंजुरीचा प्रस्ताव मुख्य रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडेच असल्याचे ते म्हणाले. हा प्रस्ताव लवकरच रेल्वे बोर्डाकडे जाईल, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)