Join us  

डॉक्टरांना संरक्षण देणारा कायदा कधी? निवासी डॉक्टरांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 5:38 AM

नायर रुग्णालयात निवासी डॉक्टरांसह सुरक्षारक्षकावर हल्ला करण्यात आला.

मुंबई : नायर रुग्णालयात निवासी डॉक्टरांसह सुरक्षारक्षकावर हल्ला करण्यात आला. याचा तीव्र निषेध करीत डॉक्टरांना संरक्षण देणारा कायदा कधी येणार, असा उद्विग्न सवाल निवासी डॉक्टरांची संघटना सेंट्रल मार्डने उपस्थित केला आहे. महाविद्यालयांच्या पातळीवर सुरक्षा व्यवस्थेचे आॅडिट करण्यात यावे, अशी मागणीही सेंट्रल मार्डने केली आहे.याविषयी, सेंट्रल मार्डच्या अध्यक्षा डॉ. कल्याणी डोंगरे यांनी सांगितले की, पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन डॉक्टरांवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांविरोधात कठोर पावले उचलण्याची मागणी करण्यात येणार आहे. त्याप्रमाणे, रुग्णांच्या नातेवाइकांना ठरावीक वेळेतच येण्याकरिता ‘पास’ पद्धत आणि मारहाणीच्या व अन्य आपत्कालीन घटनांच्या वेळी संबंधित यंत्रणांनी तत्काळ सतर्क होऊन डॉक्टर्स व समवैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी धावून येण्यासाठी ‘अलार्म सीस्टिम’ बसविणे याची अंमलबजावणी कधी होणार, असाही प्रश्न डॉ. डोंगरे यांनी उपस्थित केला आहे.दरम्यान, नायर रुग्णालयात सुरक्षा यंत्रणा पुरेशी तैनात केली आहे. त्याचा आढावा दररोज आणि नियमित घेतला जातो. यामुळे तेथील सुरक्षारक्षक वाढविण्याची गरज नाही, असा दावा या रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी केला आहे.>एका आरोपीला अटक; पोलीस तपास सुरूनायरमधील डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी रविवारी रात्री गजेंद्र कुमार मिश्रीलाल जैन (३९) याला अटक केली आहे. आग्रीपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नायर रुग्णालयात गेल्या महिन्याभरापासून राजकिशोर प्रेमाशंकर दीक्षित (५०) हे क्षयरोगावर उपचार घेत होते. उपचारादरम्यान त्यांचे रविवारी सायंकाळी निधन झाले. यादरम्यान त्यांच्या तोंडातील नळी काढल्याचा रागात जैन याने डॉक्टरांसोबत वाद केला. याच वादात त्यांना शिवीगाळ करत, दोन महिला डॉ. दीपाली श्यामसुंदर पाटील, डॉ. गौरव राजू गुंजन, डॉ. मॉईज व्होरा यांच्यासह सुरक्षारक्षक भूषण अशोक कराळे यांना धक्काबुकी केली. त्यानुसार, रात्री उशिराने डॉक्टरांच्या तक्रारीवरून आग्रीपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती आग्रीपाडा पोलिसांनी दिली.

टॅग्स :डॉक्टर