Join us

उल्हासनगरात नालेसफाई कधी?

By admin | Updated: May 6, 2015 01:27 IST

वादग्रस्त ठेकेदाराला नाले सफाईचा ठेका न देता जुन्या कंत्राटी कामगाराकडून पालिकेने नाले सफाई करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे.

सदानंद नाईक, उल्हासनगर गेल्या पावसाळ्यात नाले सफाईवर कोट्यवधी खर्च करूनही नाले तुंबून शेकडो जणाचे संसार उघड्यावर आले होते. त्यामुळे वादग्रस्त ठेकेदाराला नाले सफाईचा ठेका न देता जुन्या कंत्राटी कामगाराकडून पालिकेने नाले सफाई करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे. उल्हासनगरातील मोठ्या नाल्याची साफ सफाई खाजगी ठेकेदारामार्फत तर लहान नाल्याची सफाई प्रभाग निहाय मजूर संस्थेकडून गेल्या वर्षी करण्यात आली होती. सफाईच्या वेळी मजूर संस्थेला कामगार न मिळाल्याने त्यांना नाका कामगाराकडुन सफाई करण्याची वेळ आली. या प्रकाराबाबत नगरसेवकासह नागरिकांनी नाराजी व्यक्त करून पालिका आयुक्ताकडे ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली होती. यावेळीही मागचाच कित्ता गिरविलाजाण्याची शक्यता नगरसेवकासह पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी व्यक्त केली आहे. उल्हासनगर महापालिका हद्दीत लहान - मोठ्या नाल्यांची संख्या ४२ व त्यांची लांबी ३९० किमी. असून नाल्याच्या साफ सफाईसाठी जेसीबी व पोकलेन मशिन लागणार आहे. तर प्रभागातील लहान नाल्याची संख्या मोठी असून त्यातील केर कचरा व माती काढण्यासाठी जुन्या कंत्राटी कामगारांना प्राध्यान्य देण्याची मागणी पालिका कामगार संघटनेसह नागरिक व विविध पक्ष कार्यकर्त्यांनी केली आहे. खेमाणी नाला, वालधुनी नदी, गायकवाड पाड्याचा नाला, गुलशन नगर नाला या नाल्याची सफाई गरजेची असून वालधुनी नदीच्या पुराने दरवर्षी शेकडो जण बाधीत होत आहे. वालधुनी नदीच्या साफसफाईसह नदी किनारी संरक्षण भिंत उभारण्याची मागणी रिपाईचे प्रदेश सचिव महादेव सोनावणे, माजी नगरसेविका सुमन शेळके यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.