सुशांत मोरे, मुंबई -रेल्वेच्या २0१३-१४च्या अर्थसंकल्पात मुंबईतील शहर आणि उपनगरवासीयांच्या पदरी निराशाच आली होती. फक्त तीन घोषणा करून ७५ लाख प्रवाशांच्या अपेक्षांवर पाणी फेरण्याचे काम रेल्वे अर्थसंकल्पात करण्यात आले होते. त्यामुळे मुंबईसह ठाणे जिल्ह्यात महायुतीच्या खासदारांना निवडून देणाऱ्या जनतेचे लक्ष हे यंदाच्या २0१४-१५ च्या रेल्वे अर्थसंकल्पाकडे असणार आहे. मुंबईसह ठाणे जिल्ह्याला भरघोस अपेक्षा या रेल्वे अर्थसंकल्पाकडून आहेत. रेल्वेच्या २0१३-१४च्या अर्थसंकल्पात मुंबईला नेहमीप्रमाणे वाटाण्याच्या अक्षता दाखवण्यात आल्या होत्या. त्यामुळे हजारो कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या उपनगरीय लोकल सेवेला वारंवार अशी सापत्नक वागणूक का, असा प्रश्नही त्या वेळी पडला होता. रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी २0१३-१४ च्या अर्थसंकल्पात मुंबईतील उपनगरीय लोकलसाठी ७२ फेऱ्या, एसी लोकल, कल्याण-कर्जत तिसरा मार्ग, एलिव्हेटेड प्रकल्प पीपीपी मॉडेलवर राबवण्याची घोषणा केली. यातील ७२ फेऱ्या सोडल्या तर इतर उर्वरित घोषणा या जुन्याच होत्या. तसेच पश्चिम आणि मध्य रेल्वेमार्गावर एमयूटीपीअंतर्गत सुरू असलेल्या आणि नवीन सुरू होणाऱ्या प्रकल्पांसाठी थोडाफार निधी मंजूर करण्यात आला होेता. त्यामुळे प्रवाशांसाठी नवीन काय, असा प्रश्न त्या वेळी पडला होता. पूर्व आणि पश्चिम रेल्वेमार्ग जोडण्यासाठी अभ्यास, पनवेल ते विरार जोडण्यासाठीचे सर्वेक्षण, महिला प्रवाशांसाठी स्वच्छ प्रसाधनगृहे, महिला प्रवाशांसाठी ज्यादा फेऱ्या, अंधेरी ते विरार, बोरीवली ते विरार गाड्यांच्या ज्यादा फेऱ्या अशा मुंबईकरांना अपेक्षित असणाऱ्या महत्त्वाच्या घोषणा त्या वेळीही झाल्याच नव्हत्या. जुन्याच घोषणा करून मुंबईकरांची निराशाच रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी ओढवून घेतली होती. महत्त्वाची बाब म्हणजे घोषणा केलेल्या ७२ फेऱ्यांपैकी मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून काही फेऱ्यांची अजूनही अंमलबजावणी होणे बाकी आहे.
अपेक्षापूर्ती यंदा तरी होणार ?
By admin | Updated: July 7, 2014 00:45 IST