Join us  

होर्डिंगचा मालक भावेश भिंडे 'मातोश्री'वर काय करत होता? आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 7:17 AM

घाटकोपर दुर्घटनेवरून राजकारण तापले

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील अखेरच्या टप्प्यात मुंबईतील मतदारसंघांमध्ये प्रचार शिगेला पोहोचला असतानाच घाटकोपरमध्ये घडलेल्या होर्डिंग दुर्घटनेवरून आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडला आहे. घाटकोपर दुर्घटनेतील होर्डिंगचा मालक भावेश भिंडे याचा उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा फोटो भाजपचे आमदार राम कदम यांनी व्हायरल केल्याने राजकारण तापले. भिंडेचा उद्धव ठाकरे यांच्याशी काय संबंध, असा सवाल भाजपने केला, तर उद्धवसेनेकडूनही अडीच ते तीन वर्षे महापालिकेवर कोणाचे राज्य आहे, असा सवाल करीत प्रत्युत्तर देण्यात आले.

घाटकोपरमध्ये १४ लोकांचा बळी घेणारे होर्डिंग इगो मीडिया प्रा. लि. या कंपनीने लावले होते. भावेश भिंडे हे या कंपनीचे संचालक असून त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे आमदार राम कदम यांनी भिंडेचा उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा फोटो ट्वट करीत आरोप केले.

'१४ लोकांच्या निष्पाप बळीला जबाबदार हाच तो भावेश भिंडे. श्रीमान उद्धव ठाकरे यांच्या घरात. हे मनाला चीड आणणारे चित्र आहे. त्या अनधिकृत होर्डिंगला कोणाचे संरक्षण होते, हे या चित्रावरून स्पष्ट होते. टक्केवारीसाठी कोविड काळातले खिचडी चोर, कफनचोर आजही टक्केवारीसाठी लोकांचे नाहक बळी घेत आहेत, असा आरोप त्यांनी द्विट करीत केला. यावरून आरोप- प्रत्यारोप सुरू झाले.

भिडेने लढवली होती विधानसभा निवडणूक

भावेश भिंडे याने २००९ मध्ये मुलुंड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती. त्यावेळी दाखल प्रतिज्ञापत्रानुसार त्याच्यावर मुंबई महानगरपालिका कायदा कलम ३२८ (परवानगीशिवाय होर्डिंग लावणे) आणि कलम ४७१ (दंड) नुसार कारवाई करण्यात आलेली आहे. याशिवाय धनादेश बाउन्स केल्याप्रकरणी पोलिसांत दोन गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.

भावेश भिडे मातोश्रीवर काय करत होता? संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊत त्याला मातोश्रीवर घेऊन गेले, उद्धव ठाकरेंसोबत फोटो काढला. - नीतेश राणे, आमदार, भाजप.

या प्रकरणात राजकारण करू नये. आता सरकार आमचे, महापालिका आमचीच, मग उद्धव ठाकरेंचा काय संबंध? व्यापारी लोक आमच्याकडे येऊन फोटो काढत असतात. - छगन भुजबळ, मंत्री.

भावेश भिडेचा शिवसेनेशी काडीचाही संबंध नाही. आरोपीला अटक झालीच पाहिजे. आमचे फोटो व्हायरल केले जात आहेत. आम्हीही व्हायरल करू शकतो. - अनिल परब, आमदार, उद्धवसेना.

भावेश भिडे हा उबाठामध्ये काम करण्यास तयार झाला होता मात्र त्याच्याकडे होर्डिंगची जबाबदारी दिली. नेत्यांचे वाढदिवस आणि प्रचारासाठी या बेकायदा होर्डिंगचा वापर झाला. - उदय सामंत, उद्योगमंत्री.

'चंदा लो, धंदा लो' अशा पद्धतीने महायुतीचा आहेत. कारभार सुरू आहे. टक्केवारीत सगळे अडकले जबाबदारीतून कोणाला पळ काढता येणार नाही. - विजय वडेट्टीवार, विधानसभा विरोधी पक्षनेते.

 

टॅग्स :मुंबईघाटकोपर