Join us

मित्र दारू पिण्याचा आग्रह करताहेत काय कराल?; एमपीएससीच्या परीक्षेत प्रश्न

By दीपक भातुसे | Updated: December 3, 2024 05:02 IST

पर्यायी उत्तरांनी विद्यार्थ्यांना टाकले गोंधळात, प्रयोजनावर प्रश्नचिन्ह

दीपक भातुसे

मुंबई : तुमचे मित्र तुम्हाला मद्यपान करण्यास प्रभावित करत असतील तर तुम्ही काय कराल, याशिवाय तुम्हाला मूतखड्याच्या वेदनांना सामोरे जावे लागले तर काय कराल, असे अजब प्रश्न एमपीएससीच्या रविवारी पार पडलेल्या परीक्षेत विचारण्यात आले होते.

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ राज्यभरातील केंद्रांवर पार पडली. या परीक्षेतील वरील दोन प्रश्न आणि त्यासाठी दिलेल्या पर्यायी उत्तरांनी विद्यार्थ्यांना गोंधळात तर टाकलेच शिवाय असे अजब प्रश्न विचारण्याचे प्रयोजन काय? असा प्रश्न परीक्षार्थी विचारत आहेत.

दारूविषयी जो प्रश्न विचारला होता, त्याच्या उत्तराचे पर्यायही विद्यार्थ्यांना गोंधळात टाकणारे होते.

ही परीक्षा उत्तीर्ण होणारे भविष्यातील शासनाचे क्लास वन अधिकारी असतील. त्यात दारूवरचा प्रश्न विचारायला नको होता. यामुळे परीक्षेच्या दर्जावर प्रश्न उपस्थित होतो, अशा प्रतिक्रिया परीक्षा दिलेल्या अनेक तरुणांनी दिल्या.

प्रश्न - तुमच्या मित्रांना दारू पिणे आवडते आणि तुम्हाला ते मद्यपान करण्यास प्रभावित करत आहेत. जर तुम्हाला त्यांच्या सोबत जायचे नसेल आणि त्यांच्या अल्कोहोल सेवन करण्याच्या सवयीपासून स्वतःला बाहेर ठेवायचे असेल तर तुम्ही काय कराल?

उत्तराचे पर्याय

(१) मी माझ्या मित्रांना सांगेन की माझ्या पालकांनी मला दारू पिण्यास मनाई केली आहे.

(२) दारू पिण्यास नकार देईन.

(३) फक्त तुमचे मित्र मद्यपान करतात म्हणून मद्यपान करेन.

(४) नकार देईन आणि त्यांना खोटे बोलेन की तुम्हाला यकृताचा आजार आहे.

 

टॅग्स :एमपीएससी परीक्षा