Join us

पोलीस कॉलनीतील आवाजावर निर्बंध कुणाचे? विशाल दादलानी यांचे तक्रारीचे ‘ट्विट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 00:45 IST

एकीकडे पोलिसांकडून गणेशोत्सवादरम्यान आवाजाचे उल्लंघन करणा-यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. अशात रविवारी रात्री पोलीस कॉलनीतच लाउडस्पीकरचा आवाज वाढल्याने, गायक-संगीतकार विशाल दादलानी यांनी मुंबई पोलिसांना  ट्विटद्वारे तक्रार केली.

मुंबई : एकीकडे पोलिसांकडून गणेशोत्सवादरम्यान आवाजाचे उल्लंघन करणा-यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. अशात रविवारी रात्री पोलीस कॉलनीतच लाउडस्पीकरचा आवाज वाढल्याने, गायक-संगीतकार विशाल दादलानी यांनी मुंबई पोलिसांना  ट्विटद्वारे तक्रार केली. याची दखल घेत, ताडदेव पोलिसांनी संयोजक, लाउडस्पीकर मालकाकडून दंड आकारला.ताडदेव पोलीस वसाहतीलगतच्या टॉवरमध्ये विशाल दादलानी कुटुंबीयांसोबत राहतात. रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास पोलीस कॉलनीत लाउडस्पीकरचा दणदणाट सुरू होता. एकीकडे मुंबईतील आवाजावर कारवाई करत, तो आवाज ‘म्युट’ करत आहेत. अशा वेळी पोलीस कॉलनीतील या आवाजावर निर्बंध कुणाचे? असा प्रश्न त्यांनी थेट मुंबई पोलिसांच्या ट्विटर अकाउंटवर केला. त्यांनी लागोपाठ तीन ‘ट्विट’ केले. ‘शासनाच्या नियमानुसार, रात्री १० ते ६ दरम्यान लाउडस्पीकर वाजविण्यास बंदी आहे. असे असताना ताडदेव पोलीस वसाहतीत रात्री १०.२२ नंतरही लाउडस्पीकर वाजविण्यास परवानगी कोणी दिली? इमारतीच्या २५व्या मजल्यावर याच्या आवाजाचा पारा हा ८२ डेसिबल आहे,’ अशा आशयाचे ट्विट केले. मुंबईतील अन्य रहिवाशांनीही त्यांच्या तक्रारी मांडल्या. ट्विटची दखल घेत, ताडदेव पोलीस तेथे आले. त्यांनी संयोजक तसेच लाउडस्पीकरच्या मालकावर दंडाची आकारणी केली.