विद्यापीठाच्या त्या जागेवरून प्राधिकरण सदस्यांत दोन गट
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या एकूण २४३ एकर जमिनीचा काही भाग आता शासनाच्याच विविध योजना आणि शैक्षणिक संस्थांसाठी उपयोगात आणण्याच्या हालचाली सुरु असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. कालिना संकुलातील जागेसाठी या संस्थांकडून विचारणा होत असताना विद्यापीठाच्या आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी आखल्या जाणाऱ्या कालिना संकुल विकासाच्या आराखड्याचे काय? असा प्रश्न अनेक सिनेट सदस्य उपस्थित करत आहेत. दरम्यान, कालिना संकुलाच्या विकास आराखड्याचा प्रश्न मार्गी लावून मगच या शैक्षणिक संस्थांच्या जागेचा प्रश्न सोडवावा अशी मागणी काही सदस्यांकडून होत आहे.
एमएमआरडीएकडून वेळेत विकास आराखडा उपलब्ध झाला नाही म्हणून मुंबई विद्यापीठाचा विकास रखडला आहे. त्यातच विविध शैक्षणिक संस्थांकडून कालिना संकुलातील जागेची मागणी होत असल्यास भविष्यात विद्यापीठाला त्यांच्या विभागांचा विस्तार करायचा झाला तर जागा उपलब्ध होईल का असा प्रश्नही विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणावरील सदस्य विचारत आहेत. मात्र या बाबतीत विद्यापीठ प्राधिकरणांमध्ये २ गट पडले असून शासनाकडून ज्या शैक्षणिक संस्थांसाठी जागेची मागणी होत आहे, त्या विद्यापीठातच झाल्यास विद्यार्थी हिताचेच ठरेल असे काही प्राधिकरण सदस्यांचे म्हणणे आहे. उर्दू भवन, कौशल्य विद्यापीठ, आयडॉल, संगीत विद्यालय हे सारे एकाच छत्राखाली विद्यार्थ्यांना उपलब्ध झाल्यास त्यात गैर काय असा प्रश्न सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी उपस्थित केला आहे. या आधी ही विद्यापीठातील अनेक जागा या बाहेरील व्यावसायिक कोर्सेस आणि उपक्रमांसाठी देण्यात आल्या असताना शासनाच्याच शिक्षण संस्थांसाठी विद्यापीठाची काही जागा दिल्यास ते विद्यार्थी हिताचेच ठरेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
या आधीच विद्यापीठाची काही जागा एमएमआरडीएला या भागात पूल बांधण्यासाठी देण्यात आली आहे. नव्याने मागविण्यात आलेल्या प्रस्तावामध्ये यामध्ये सर्वाधिक १५ एकर जागा ही नव्याने उभारण्यात येणाऱ्या कौशल्य विद्यापीठासाठी मागण्यात आली आहे. कला संचालनालयाने मुंबई विद्यापीठाकडे मास्टर दिनानाथ मंगेशकर संगीत विद्यालय आणि दादासाहेब फाळके कला चित्रपट कॉलेजसाठी असा मिळून दहा एकर जागेचा प्रस्ताव सादर केला आहे. याबाबत मुंबई विद्यापीठाने व्यवस्थापन परिषदेत चर्चा करण्यात आली आहे. दरम्यान, हा विषय सध्यस्थितीत तरी प्राथमिक चर्चेतच असून यावर अद्याप कोणताही निर्णय किंवा प्रस्ताव नसल्याची माहिती विद्यापीठ रजिस्ट्रार बळीराम गायकवाड यांनी दिली.