Join us  

ठेवीदारांना पैसे परत करण्यासाठी काय योजना आहे ?, एक आठवड्याचा अंतरिम दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 5:26 AM

मुंबई : डीएसकेंच्या योजनांमध्ये गुंतवणूक करणा-यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने उच्च न्यायालयाने याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

मुंबई : डीएसकेंच्या योजनांमध्ये गुंतवणूक करणा-यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने उच्च न्यायालयाने याबाबत चिंता व्यक्त केली आहे. या सर्व ठेवीदारांची रक्कम परत करण्यासाठी काय योजना आहे, अशी विचारणा डीएसकेंना करत पुढील आठवड्यात ही योजना सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले तसेच तोपर्यंत त्यांना अटक न करण्याचे निर्देशही पोलिसांना दिले.ठेवीदारांचे २०० कोटी रुपये बुडविल्याप्रकरणी डीएसके व त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्यावर पुणे व कोल्हापूर पोलिसांनी गुन्हा नोंदवला. या प्रकरणी अटक होऊ नये, यासाठी डीएसके दाम्पत्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. अजय गडकरी यांच्यापुढे होती.गुरुवारच्या सुनावणीत डीएसकेंचे वकील अशोक मुंदर्गी यांनी डीएसके त्यांची काही मालमत्ता विकून ठेवीदारांना पैसे परत करण्यास तयार असल्याचे न्यायालयाला सांगितले.‘सध्या डीएसकेंच्या ताब्यात एकही मालमत्ता नाही. सर्व मालमत्तांची कागदपत्रे पोलिसांकडे आहेत. वास्तविक ठेवीदारांची एकूण देय रक्कम १८९ कोटी रुपये आहे. मात्र आम्ही २०० कोटी रुपये द्यायला तयार आहोत. त्यासाठी पोलिसांनी काही मालमत्तांची कागदपत्रे द्यावीत. सक्षम प्राधिकरणाच्या देखरेखीत ही मालमत्ता विकण्यात येईल व सर्व रक्कम सरकारकडे जमा केली जाईल,’ असे मुंदर्गी यांनी न्यायालयाला सांगितले.दरम्यान, सरकारी वकिलांनी डीएसकेंच्या २६६ मालमत्ता असल्याची माहिती न्यायालयाला दिली. त्यावर न्यायालयाने डीएसकेंना पुढील आठवड्यात त्यांच्या मालमत्तांची यादी सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच १,३५० ठेवीदारांची ठेव परत करण्यासंदर्भात ठोस योजना सादर करण्याचेही निर्देश डीएसकेंना दिले. न्यायालयाने डीएसके व त्यांच्या पत्नीला ३० नोव्हेंबरपर्यंत अंतरिम दिलासा दिला. डीएसकेंच्या वेगवेगळ्या योजनांंमध्ये गुंतवलेले पैसे परत न मिळाल्याने काही ठेवीदारांनी डीएसके यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली. त्यांच्या तक्रारींची दखल घेत पुणे आर्थिक अन्वेषण गुन्हे विभागाने (ईओडब्ल्यू) डीएसकेंच्या घरावर छापा घातला.

टॅग्स :डी.एस. कुलकर्णीपुणेन्यायालय