Join us  

वाढलेला मतांचा टक्का आणि मनसेच्या ‘नोटा’चा कौल कुणाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2019 3:48 AM

३५ अंश सेल्सिअस तापमान, हवेतील आर्द्रता, उष्माच्या झळा आणि सलग लागून आलेल्या सुट्ट्यांना झिडकारून उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात मराठी, गुजराती, मारवाडी मतदार मोठ्या प्रमाणात मतदानासाठी उतरल्याचे चित्र येथे बघायला मिळाले.

मनोहर कुंभेजकर३५ अंश सेल्सिअस तापमान, हवेतील आर्द्रता, उष्माच्या झळा आणि सलग लागून आलेल्या सुट्ट्यांना झिडकारून उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात मराठी, गुजराती, मारवाडी मतदार मोठ्या प्रमाणात मतदानासाठी उतरल्याचे चित्र येथे बघायला मिळाले. २०१४ साली येथे एकूण ५०.४४ टक्के मतदान झाले होते, तर यंदा येथे ५४.७१ टक्के मतदान झाले. यंदा वाढलेले ४.२७ टक्के मतदान कोणाच्या पथ्यावर पडते, यावर उमेदवांरांचे भवितव्य अवलंबून आहे.

पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान करण्यासाठी या एका मुद्द्यावर येथील मतदारांची अस्मिता चेतवण्याचे प्रयत्न शिवसेना-भाजपकडून करण्यात आले. मागील निवडणुकीत ज्या मतदारांनी युतीला आधार दिला होता, त्या मतदारांनी दूर जाऊ नये, यासाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी बरेच प्रयत्न केल्याचे दिसून आले. येथे कीर्तिकर यांना प्रस्थापितांविरोधी नाराजीचा फटका बसेल, असा अंदाज येताच शिवसेनेने त्याच्या भरपाईसाठी, डागडुजीसाठी प्रयत्न सुरू केले. भाजपनेही या मतदारसंघातील नाराजीवर मात्रा मिळताच कामाला सुरूवात केली.काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार संजय निरुपम यांनी उमेदवारी अर्ज भरल्यावर मतदारसंघ पिंजून काढला. निरुपम यांची जास्त मदार अल्पसंख्यांक मतदारांवर होती. मतदान केंद्रावर अल्पसंख्यांक मतदारांची गर्दी दिसून येत होती. ज्या उत्तर भारतीयांची बाजू निरूपम यांनी गेल्या काही वर्षांत उचलून धरली, ते मतदार या वेळी साह्य करतील हे त्यांनी गृहीत धरले होते. त्यातही त्यातील जो कष्टकरी वर्ग आहे, त्यावर त्यांची सर्वाधिक मदार होती. त्यामुळे हे मतदार मागील निवडणुकीप्रमाणे सरसकट युतीला साह्य करणार नाहीत, असा त्यांचा दावा आहे. निरूपम यांचा हा मतदार गृहीत धरून ती मतपेढी टिकवण्यासाठी युतीच्या नेत्यांनीही बरेच प्रयत्न केल्याचे दिसून आले.

मात्र काँग्रेसमधील गटबाजीचे दर्शन यावेळच्या प्रचारात घडले. निरूपम यांनी या मतदारसंघावर दावा सांगितल्यापासूनच येथे खदखद होती. त्यामुळे कामत आणि कृपाशंकर सिंह यांच्या गटाने निरुपम यांना तशी साथ दिली नाही. मुंबई विभागीय काँग्रेसचे त्यांचे पद लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गेले होते. मात्र मतदारसंघ बदलण्याची त्यांची मागणी पक्षाने मान्य केली होती. त्या स्थितीत येथून काहीही करून निवडून येणे ही निरूपम यांची राजकीय गरज बनल्याने त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती.

यापूर्वी परप्रांतीयांच्या मुद्द्यावर मनसे आणि निरुपम यांच्यात खटका उडाला होता. मनसेचा तो राग अद्याप शमलेला नसल्याचे यावेळच्या प्रचारात दिसून आले. अन्यत्र जरी मनसेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला असला, त्यांच्यासाठी काम केले असले, तरी येथे मात्र मनसेची भूमिका तटस्थ राहिली. त्यामुळेच त्याचा फायदा आम्हालाच मिळेल, असा दावा शिवसेना नेत्यांनी केला. येथील मराठी मतांचे विभाजन होणार की नाही, हा एकच मुद्दा अखेरपर्यंत चर्चेत राहिला. या मतदारसंघात नोटासाठी भरपूर मतदान झाले असेल, असा दावा केला जातो आहे. तो कितपत खरा आहे, ते मतमोजणीच्यावेळी कळेल. 

येथील जवळपास सर्वच विधानसभा मतदारसंघांत मतदानाचा टक्का वाढला आहे. त्यावर दोन्ही पक्षाचे नेते दावा करत आहेत. युतीच्या नेत्यांना हा मतदारांनी त्यांच्यावर पुन्हा व्यक्त केलेला विश्वास वाटतो, तर काँग्रेसच्या नेत्यांना ही वाढीव मते त्यांची असल्याचे वाटते. त्यामुळे मतदानानंतर दोन्ही उमेदवारांच्या विजयाचे दावे-प्रतिदावे आधीपेक्षा खूपच प्रबळ झाले आहेत.

टॅग्स :निवडणूकमनसेमतदान