Join us  

लॉकडाऊन काळात नेमके काय आणि कसे घडले? एसटीला मालवाहतुकीचा आधार, तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2020 3:53 AM

त्यानंतर राज्याच्या विविध भागांतून अन्नधान्य, बी-बियाणे, खते, भाजीपाला, कृषी उत्पादने यासोबत लोखंडी पाइप, रंगांचे डबे अशा विविध प्रकारच्या मालाची वाहतूक मालवाहू एसटीमधून केली जात आहे

मुंबई : लॉकडाऊन काळात एसटीचे प्रवासी उत्पन्न बंद झाले. त्यामुळे आधीच डबघाईला आलेली एसटी सेवा लॉकडाऊन काळात आर्थिक संकटात सापडली आहे. मात्र एसटीने मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे एसटीला माल वाहतुकीचा आधार मिळाला आहे. मागील महिन्यापासून एसटीने सुरू केलेल्या मालवाहतुकीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. राज्य सरकारने १८ मे रोजी मालवाहतूक बसचा शुभारंभ रत्नागिरी येथून आंब्यांच्या पेट्या बोरीवलीला पाठवून करण्यात आला.

त्यानंतर राज्याच्या विविध भागांतून अन्नधान्य, बी-बियाणे, खते, भाजीपाला, कृषी उत्पादने यासोबत लोखंडी पाइप, रंगांचे डबे अशा विविध प्रकारच्या मालाची वाहतूक मालवाहू एसटीमधून केली जात आहे. नुकताच विठुमाऊलीच्या दर्शनाला, आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला राज्यभरातील मानाच्या पालख्या निवडक वारकऱ्यांसह एसटीने दिमाखात पंढरी नगरीमध्ये गेल्या. देहू येथून संत तुकाराम, आळंदी येथून संत ज्ञानेश्वर, सासवड येथून संत चांगवटेश्वर व संत सोपानदेव, नेवासा येथून संत मुक्ताई, त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथ, संत नामदेव यांच्या पालख्या पंढरपूरकडे गेल्या. दररोज १२ ते १४ हजार अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी प्रवास करतात.

लॉकडाऊनच्या काळात रेल्वेची मालवाहतूक वेगातमुंबई : रेल्वे सेवा कोरोनामुळे बंद आहे. मात्र देशभरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी मालगाड्या, पार्सल गाड्या सुरू आहेत. २३ मार्च ते ३० जून या कालावधीत मध्य रेल्वेने एकूण २ लाख ५४ हजार वॅगनमधून १३ लाख ३९ हजार टन मालाची वाहतूक केली आहे. लॉकडाऊनच्या १०० दिवसांत मध्य रेल्वेने ५ हजार ३०६ मालगाड्यांतून कोळसा, अन्नधान्य, साखर, पेट्रोलियम उत्पादने, खते, कंटेनर, लोखंड आणि स्टील, सिमेंट, कांदे यांची वाहतूक केली. या कालावधीत दररोज सरासरी २ हजार ५४३ वॅगन मालाची वाहतूक केली. त्यामुळेच १०० दिवसात २ लाख ५४ हजार ३३५ वॅगनमधून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणे शक्य झाले.कोरोनामुळे लॉकडाऊन घोषित झाला आणि संपूर्ण देश थांबला. सुरु वातीच्या एका महिन्यात लॉकडाऊनचा प्रचंड वैताग आला होता. मी शेवटच्या वर्षातील विद्यार्थी असल्याने परीक्षा होईल या आशेने अभ्यास करत होतो. परंतु शेवटच्या वर्षातील परीक्षा रद्द झाल्या. अजूनही कोरोना आटोक्यात आला नसला तरीही स्वत:ची काळजी घेत कोरोनासोबत जगायला सुरु वात केली आहे. - आशिष खरात, रहिवासी, भांडुपजनता कर्फ्यूच्या आदल्या दिवशी मी कोरोनाच्या भीतीपोटी कुटुंबासोबत गावाला निघून गेलो. परंतु कोरोनाचा संसर्ग वाढतच गेल्याने लॉकडाऊनही वाढला. या काळात कंपनीने पगारातही पन्नास टक्क्यांनी कपात केली. यामुळे घरखर्च चालविणे कठीण झाले. जून महिन्यापासून कंपनीने बोलाविल्याने कुटुंबासहित पुन्हा मुंबईत आलो आहे. परंतु कोरोनाचा संसर्ग वाढतच असल्याने भीतीच्या सावटाखाली जगावे लागत आहे. - किशोर नाईक, रहिवासी, दादरकोरोनाच्या काळात सुरुवातीचे तीन महिने लॉकडाऊन अत्यंत कडक शिस्तीत पाळला गेला. परंतु त्यानंतर काही प्रमाणात शिथिलता दिल्यानंतर नागरिक विविध कारणांसाठी घराबाहेर पडू लागले. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दीही होऊ लागली. नागरिक आजही लॉकडाऊन व अनलॉक या दोन्ही प्रक्रि यांमध्ये गोंधळलेले दिसत आहेत. प्रशासनाने विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करायला हवी. - मानसी कालुष्टे, रहिवासी, वाकोलाकोरोनाचा संसर्ग रोखण्यात सरकारला अपयश आले आहे. मुंबईच्या उपनगरातील झोपडपट्टयांमध्ये कोरोनाचा संसर्ग अद्यापही वाढतच आहे. त्यातच प्रशासन लॉकडाऊन संदर्भात दररोज नवीन नियम काढत आहे. यामुळे नागरिकही मोठ्या संभ्रमावस्थेत जगत आहेत. मुंबईत कोरोनाचा संसर्ग रोखायचा असल्यास अजून काही दिवस कठोर लॉकडाऊन करण्याची आवश्यकता वाटत आहे. महापालिकेनेही मुंबईतील झोपडपट्टी भागांमध्ये विशेष लक्ष देण्याची गरज आहे. - भगवान हजारे, रहिवासी, चेंबूर 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या