Join us

रिक्षाचालकांना वेळेत मदत न मिळाल्यास त्याचा फायदा काय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:06 IST

रिक्षाचालकांनी उपस्थित केला प्रश्नलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लॉकडाऊनमुळे अनेक रिक्षाचालकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे राज्यातील ...

रिक्षाचालकांनी उपस्थित केला प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : लॉकडाऊनमुळे अनेक रिक्षाचालकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे राज्यातील रिक्षाचालकांना १,५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. बँक खात्यावर थेट अनुदान जमा करण्यासाठी महाआयटीकडून प्रणाली तयार केली जाणार असून, त्यासाठी साधारण १ महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागणार आहे. त्यानंतर रिक्षाचालकांना अनुदानाचा लाभ मिळणार आहे. जर वेळेत मदत मिळत नसेल तर त्याचा फायदा काय, असा प्रश्न रिक्षाचालक विचारत आहेत.

स्वाभिमानी टॅक्सी-रिक्षा युनियनचे मुंबई अध्यक्ष के. के. तिवारी म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे रिक्षा-टॅक्सीवर घर चालवणाारे लाखो चालक-मालक अस्वस्थ झाले आहेत. आम्ही सरकारकडे रिक्षाचालकांसाठी दहा हजार रुपयांची मागणी केली होती, परंतु केवळ दीड हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही मदत पुरेशी नाही. मात्र, तीही वेळेत मिळत नाही. जर वेळ निघून गेल्यावर मदत मिळाली तर त्याचा काय फायदा, असा सवाल आहे.

राज्यात ७ लाख १५ हजार रिक्षा परवानाधारकांना प्रत्येकी १,५०० रुपयेप्रमाणे एकूण १०७ कोटी रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय झाला. ही रक्कम संबंधितांच्या बँक खात्यांवर थेट ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र, रिक्षाचालकांना हे अनुदान मिळण्यासाठी एक महिन्याहून अधिक कालावधी लागणार आहे.

* बॅंक खात्यात जमा हाेणार रक्कम

अनुदान जमा करण्यासाठी परिवहन विभागामार्फत ऑनलाईन प्रणाली म्हणजेच पोर्टल विकसित करण्यात येणार आहे. त्यामध्ये परवानाधारक रिक्षाचालकांना आपले आधार क्रमांक, वाहन क्रमांक व अनुज्ञप्ती क्रमांक याची नोंद करावी लागेल. खातरजमा झाल्यानंतरच आधार क्रमांकाशी जोडणी असलेल्या बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात येईल.

------------------