वैभव गायकर - नवी मुंबईखारघर टोल आणि वाद हे जणू समीकरणच झाले आहे. टोल सुरु झाल्यापासून त्याच्या वसुलीबाबत स्थानिक संभ्रमात आहेत. पनवेल तालुक्यात नोव्हेंबर २०१० ते डिसेंबर २०१४ या काळावधीत प्रादेशिक परिवहन कार्यालयात ५० हजार ७७८ चारचाकी गाड्यांची नोंद करण्यात आली आहे. अवजड वाहनांची संख्या देखिल १० हजारांच्या वर आहे. तालुक्यातील ५० हजारांपेक्षा जास्त खासगी वाहनांना टोलमध्ये सरसकट सूट मिळावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. टोल वसूल करणाऱ्या ‘सायन पनवेल टोलवेज प्रा. लि.’च्या अधिसूचनेनुसार टोलवसुलीमधून वगळण्यात आलेल्या पाच गावांतील वाहनांना टोल मधून सुट देण्यासाठी वाहनावर लावण्यात येणारे टॅग देण्याचे काम सुरू झाले आहे. वगळण्यात आलेल्या गावांतील खासगी गाड्यांच्या आर. सी. बुकची प्रत, रहिवासी पुरावा म्हणून विजेचे बिल, फोन बिल, बँकेचे पासबुक, मतदार ओळखपत्र यापैकी एक प्रत एसपीटीपीएल यांनी सुरू केलेल्या केंद्रात स्वीकारली जात आहे. सायन पनवेल मार्गावरील तळोजा लिंक रोड उड्डाणपुलाखाली हे केंद्र मंगळवार पासून सुरू करण्यात आले आहे. या टॅगसाठी प्रत्येकी १५० रुपयांचा भुर्दंड वाहनचालकांना बसणार आहे. दरम्यान टॅग मिळवण्यासाठी केंद्रावर रांगा लागण्यास सुरुवात झाली आहे. सकाळी नऊ ते रात्री आठदरम्यान केंद्र सुरू राहणार आहे. बुधवारी दोन हजार वाहनधारकांना टॅग वाटप करण्यात आले. पनवेल तालुक्यातील केवळ पाच गावांना टोल आकारणीतुन वगळण्यात आले आहे. मात्र तालुक्यातील ३२ गावांना या टोल मधून सुट द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. टोल प्लाझावर स्थानिकांना ये-जा करण्यासाठी सर्विस रोड व रुग्णवाहिकेसाठीही वेगळा रस्ता उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे. कंपनीमार्फत याठिकाणी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करून चोख बंदोबस्त ठेवला आहे. उपाययोजनांविषयी उत्सुकतापनवेल तालुक्यात पन्नास हजारांपेक्षा जास्त खासगी वाहन आहेत. अवजड वाहनांची संख्या देखील दहा हजारांच्या वर आहे त्यामुळे नेहमीच्या येजा करणाऱ्या या वाहनांना बसणार भुर्दंड थांबविण्यासाठी काय उपाययोजना राबविण्यात येणार आहेत हा मुख्य प्रश्न सध्या उपस्थित होत आहे . खारघर टोल नाका सुरू झाला असला तरी तालुक्यातील सर्वच वाहनांना टोलवसुलीतून सूट मिळावी, अशी आपली मागणी पूर्वीपासूनच होती आणि आताही आहे. त्यासाठी आपण पाठपुरावा करीत आहोत.- प्रशांत ठाकूर, आमदार, पनवेल
पनवेलच्या ५० हजार वाहनांचे काय?
By admin | Updated: January 8, 2015 01:53 IST