Join us

पाणीविरहित टॉयलेट्सने मिटवली लोको पायलटची चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 07:07 IST

Western Railway: रेल्वेगाडी चालविताना लोको पायलट्सना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातलीच एक अडचण म्हणजे कर्तव्य बजावत असताना शरीरधर्म कसा पाळावा ही. पश्चिम रेल्वेने त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला असून ताफ्यातील ८२१ इंजिनांपैकी सहा इंजिनांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर पाणीविरहित शौचालयांची व्यवस्था केली आहे.

 मुंबई -  रेल्वेगाडी चालविताना लोको पायलट्सना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातलीच एक अडचण म्हणजे कर्तव्य बजावत असताना शरीरधर्म कसा पाळावा ही. पश्चिम रेल्वेने त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला असून ताफ्यातील ८२१ इंजिनांपैकी सहा इंजिनांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर पाणीविरहित शौचालयांची व्यवस्था केली आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास आणखी ८० इंजिनांमध्ये ही शौचालये बसविली जाणार आहेत. 

लोको पायलट आणि सहायक यांना तासन तास गाडी चालवावी लागते. टॉयलेटसाठी थांबण्याची किंवा पर्यायी सुविधा मिळण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे चालकांची कुचंबणा होते. विशेषत: रात्रीच्या वेळी आणि दुर्गम भागात या समस्येचा मोठा त्रास होतो. त्यावर उपाय म्हणून पश्चिम रेल्वेने वरीलप्रमाणे सुविधा दिली आहे. रेल्वे मंडळाने ४६० इंजिनांमध्ये पाणीविरहित शौचालये बसविण्यासाठी मंजुरी दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.' 

वॉटरलेस टॉयलेट्स म्हणजे काय? या विशेष प्रकारच्या टॉयलेट्समध्ये पाण्याचा वापर न करता स्वच्छता राखली जाते. हे टॉयलेट्स पर्यावरणपूरक असून, त्यातून कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. त्यामुळे रेल्वे मार्गावरील स्वच्छता कायम राखता येते. 

५६४ इंजिनांमध्ये एसी पश्चिम रेल्वेच्या ताफ्यातील ८२१ पैकी ५६४ इंजिनमध्ये वातानुकूलित यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यात प्रवासी रेल्वेगाड्या आणि मालवाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या रेल्वेगाडीचा समावेश आहे. सद्य:स्थितीत आणखी १७८ इंजिनमध्ये वातानुकूलित यंत्रणा बसवण्यास मंजुरी मिळाली असून, त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तर ७९ इंजिनमध्ये तांत्रिक अडचणींमुळे वातानुकूलित यंत्रणा बसवणे अशक्य असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :पश्चिम रेल्वेभारतीय रेल्वे