Join us

पश्चिम रेल्वे खोळंबली

By admin | Updated: May 15, 2016 05:03 IST

पश्चिम रेल्वेवर गुरुवार आणि शुक्रवारी झालेल्या गोंधळानंतर शनिवारी सकाळी पुन्हा एकदा झालेल्या तांत्रिक बिघाडाचा फटका प्रवाशांना बसला. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकाजवळील

मुंबई : पश्चिम रेल्वेवर गुरुवार आणि शुक्रवारी झालेल्या गोंधळानंतर शनिवारी सकाळी पुन्हा एकदा झालेल्या तांत्रिक बिघाडाचा फटका प्रवाशांना बसला. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकाजवळील सिग्नलमध्ये झालेल्या बिघाडामुळे जलद आणि धिम्या मार्गावरील अप-डाऊन लोकल सेवा विस्कळीत झाली होती. ही सेवा अर्धा ते पाऊण तासाने पूर्ववत झाली असली तरी ऐन सकाळी कामासाठी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांचा प्रचंड मनस्ताप झाला. गुरुवारी सकाळी झालेल्या या तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेमार्गावर अंधेरी येथे लोकलची रांग लागली. याचा फटका जलद आणि धिम्या मार्गावरील अप-डाऊन दिशेला प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसला. सिग्नलमधील बिघाड दुरुस्त झाल्यानंतर जलद मार्गावरील सेवा साडेअकराच्या सुमारास पूर्ववत झाली, तर धिम्या मार्गावरील सेवा पूर्ववत होण्यास एक तास लागला. दरम्यानच्या काळात पश्चिम रेल्वेमार्गावरील लोकलच्या सुमारे ४० फेऱ्या रद्द करण्यात आल्या, तर १०० फेऱ्यांना लेटमार्क बसल्याने या मार्गावरील लोकल विलंबाने धावत होत्या. (प्रतिनिधी)वीकेण्डला मुंबई-गोवा मार्गावर खोळंबा रायगड : शनिवारी सकाळी ८ वाजल्यापासून ते ३ वाजेपर्यंत वडखळ-पेण व त्यापुढे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे परिसरात वाहतूककोंडी झाली. उन्हाळी सुटी आणि शनिवार-रविवार वीकेण्डमुळे पर्यटकांची महामार्गावर मोठी गर्दी होती. जवळजवळ आठ ते दहा तास वाहने संथ गतीने चालत होती. परिणामी, ऊन आणि धुळीमुळे प्रवासी कासावीस झाले. विशेषत: लहान मुले व ज्येष्ठ नागरिक वाहतूककोंडीमुळे हैराण झाले. मुंबईहून येणारे प्रवासी सहा ते सात तास प्रवासात वडखळपर्यंत अडकले होते. त्यामध्ये रुग्णवाहिका तसेच लग्नातील वऱ्हाडातील वाहनांचाही समावेश होता. गेल्या तीन-चार वर्षांपासून महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. हे काम धिम्यागतीने सुरू असल्याचे चालकांचे म्हणणे आहे. रात्री ८ वाजेपर्यंत वाहतूककोंडी नियंत्रणात आणण्याकरिता पोलिसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. (प्रतिनिधी)