Join us  

पश्चिम रेल्वेचा खेळखंडोबा! गोखले पुलाच्या कामामुळे वेळापत्रक कोलमडले, प्रवासी वैतागले

By मोरेश्वर येरम | Published: January 05, 2024 9:34 AM

मुंबई महापालिकेकडून अंधेरी येथील गोखले पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे.

मोरेश्वर येरम, मुंबई: मुंबई मनपाकडून अंधेरी येथील गोखले पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम वेगाने आणि नीटनेटके व्हावे यासाठी पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. पण या बदललेल्या वेळापत्रकामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पश्चिम रेल्वेवर चर्चगेटच्या दिशेची वाहतूक आज १५ ते २० मिनिटं उशिराने सुरू आहे. तसेच बदललेल्या वेळापत्रकामुळे लोकल गाड्यांचे ठरलेले प्लॅटफॅार्मही बदलले गेले आहेत. यामुळे प्रवाशांना गाडी पकडताना धावपळ करावी लागत आहे. 

उशीराने सुरु असलेली वाहतूक त्यात विरारहून सकाळी ८.३३ वाजता सुटणारी एसी लोकल अचानक नॅान एसी करण्यात आली. यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडाला. पुढच्या सर्व एसी लोकलवर यामुळे प्रवाशांचा अतिरिक्त भार वाढला आहे. बदललेल्या वेळापत्रकाची प्रवाशांना फारशी कल्पना नसल्यामुळे पुरता गोंधळ उडाला आहे. 

कोलमडलेल्या वेळापत्रकामुळे विरार, नालासोपारा प्लॅटफॅार्मवर प्रवाशांची तुडूंब गर्दी झाली आहे. पश्चिम रेल्वेच्या या सावळ्या गोंधळामुळे चाकरमान्यांना आज कामावर लेटमार्कला सामोरे जावे लागणार आहे. 

पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात केलेले बदल पुढीलप्रमाणे…

 लोकल क्रमांक ९२०४२ विरार-चर्चगेट लोकल विरारहून ८:०१ वाजता सुटते. आता विरारहून ७:५५ वाजता सुटेल.

 लोकल क्रमांक ९४०१६ विरार-चर्चगेट एसी लोकल विरारहून ७:५६ वाजता सुटते. आता विरारहून ७:५९ वाजता सुटेल.

 लोकल क्रमांक ९२०२७ चर्चगेट-चर्चगेटहून ६:४० वाजता सुटणारी विरार लोकल आता चर्चगेटहून ६:३२ वाजता सुटेल.

 लोकल क्रमांक ९२०६७ चर्चगेट-बोरिवली लोकल चर्चगेटहून ९:२७ वाजता सुटते. आता चर्चगेटहून ९:१९ वाजता सुटेल.

 लोकल क्रमांक ९४०१९ चर्चगेट-विरार एसी लोकल चर्चगेटहून ९:१९ वाजता सुटते. आता चर्चगेट येथून ९:२३ वाजता सुटेल.

 लोकल क्रमांक ९४०२१ चर्चगेट-बोरिवली एसी लोकल चर्चगेटहून ९:२४ वाजता सुटते. आता चर्चगेट येथून ९:२७ वाजता सुटेल.

लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही फटका :

  ट्रेन क्रमांक १९०३८ बरौनी-वांद्रे टर्मिनस अवध एक्स्प्रेस बोरिवली येथे ४५ मिनिटांनी नियमित केली जाईल. वांद्रे टर्मिनसवर ६० मिनिटे उशिरा पोहोचेल. गाडी क्रमांक २०९४२ गाझीपूर सिटी-वांद्रे टर्मिनस सुपरफास्ट एक्स्प्रेस बोरिवली येथे ३० मिनिटांनी नियमित केली जाईल आणि वांद्रे टर्मिनसला ५४ मिनिटे उशिराने पोहोचेल. 

ट्रेन क्रमांक २२९४६ :

ओखा-मुंबई सेंट्रल सौराष्ट्र मेल सुरत-बोरिवली सेक्शनवर ३० मिनिटांनी नियमित होईल आणि मुंबई सेंट्रलला ३० मिनिटे उशिराने पोहोचेल. 

टॅग्स :पश्चिम रेल्वेनगर पालिका