Join us
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम रेल्वेच्या लोकलला डिजिटल डिस्प्ले; लोकल कोणती हे पाहता येणार

By सचिन लुंगसे | Updated: June 13, 2024 23:28 IST

रेल्वे स्थानकांच्या फलाटांवर आलेली लोकल नेमकी कोणती आहे ? हे पाहण्यासाठी प्रवाशांना एक तर इंडीकेटर बघावे लागते किंवा लोकलच्या दर्शनी भागावर नजर ठेवावी लागते.

मुंबई : रेल्वे स्थानकांच्या फलाटांवर आलेली लोकल नेमकी कोणती आहे ? हे पाहण्यासाठी प्रवाशांना एक तर इंडीकेटर बघावे लागते किंवा लोकलच्या दर्शनी भागावर नजर ठेवावी लागते. मात्र हे पाहण्यात गोंधळ झाला तर लोकल कोणती आहे ? हे सहप्रवाशांना विचारावे लागते. यावर दिलासा म्हणून पश्चिम रेल्वे नवीन युक्ती शोधून काढली असून, पश्चिम रेल्वेच्या लोकलवर डिजिटल डिस्प्ले लावण्यात येत आहेत. याद्वारे फलाटावर दाखल झालेली लोकल कोणती आहे ? हे प्रवाशांना समजण्यास आणखी मदत होणार आहे.मुंबई सेंट्रल येथे असलेल्या पश्चिम रेल्वेच्या ईएमयू कारशेडने नवीन हेड कोड डिस्प्ले सादर केला आहे. हे वैशिष्ट्य प्रवाशांना लोकल ट्रेनच्या गंतव्यस्थानाची स्पष्ट आणि त्वरित माहिती करून देईल. डिस्प्लेचे वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा गार्ड मूळ स्थानकावर त्याच्या कॅबमध्ये बसतो आणि ट्रेनचा क्रमांक फीड करतो तेव्हा प्रवासाचे सर्व तपशील बाजूला बसवलेल्या डिजिटल डिस्प्लेवर अचूकपणे दिसतात. डिजिटल डिस्प्ले ३ सेकंदांच्या अंतराने भाषा बदलून इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषांमध्ये ट्रेनचे गंतव्यस्थान दर्शवेल. याशिवाय लोकल जलद किंवा धीमी आणि बारा डबे कि पंधरा डबे अशी माहिती मिळणार आहे.डिजिटल डिस्प्ले फुल एचडी आहेत. काचेने संरक्षित आहेत. प्रवाशांना स्क्रीनवर कोड सहजपणे पाहण्यास मदत होईल. ५ मीटरपर्यंतच्या अंतरावरून स्पष्टपणे दृश्यमान होईल. सध्या एका रेकमध्ये डिस्प्ले सिस्टीम बसवण्यात आली आहे. ज्यामध्ये प्रत्येक बाजूला चार डिजिटल डिस्प्ले असलेले एकूण आठ डिजिटल डिस्प्ले आहेत.- विनीत अभिषेक, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे