मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या ६२व्या राष्ट्रीय रेल्वे सप्ताह पुरस्कार वितरण सोहळ्यात पश्चिम रेल्वेने आपला ठसा उमटवला. रायपूर येथे झालेल्या कार्यक्रमात पश्चिम रेल्वेला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा शिल्ड प्रदान करून गौरविण्यात आले. ही शिल्ड महाव्यवस्थापक डी.के. शर्मा आणि मुख्य सुरक्षा आयुक्त उदय शुक्ल यांनी स्वीकारली. त्याचप्रमाणे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांच्यासह ६ अधिकाऱ्यांना गौरविण्यात आले.२०१६-१७ या वर्षात आपले कर्तव्य चोख बजावणाऱ्या ६ कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. प.रे.चे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर, मुंबई मध्य मंडळाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक आरती सिंह परिहार, चर्चगेट मुख्य कार्यालयातील उप प्रमुख मुख्य अभियंता शिवचरण बैरवा, वडोदराचे मुख्य कारखाना व्यवस्थापक निलोत्पल डे, रतलाम मंडळाचे वरिष्ठ मंडळ परिचालन व्यवस्थापक पवन कुमार सिंह आणि मुंबई मध्य मंडळाचे वरिष्ठ अनुभाग अभियंता आनंद कुवलेकर यांना राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्काराने गौरविण्यात आले. पदक, रोख रक्कम, मानपत्र असे राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार सोहळ्यात मुंबई मध्य मंडळाच्या वरिष्ठ मंडळ यांत्रिक अभियंता रुपेश कोहलीने इंग्रजी निबंध स्पर्धेत जयश्री राऊत यांना स्क्रॅप डिस्पोजल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (प्रतिनिधी)
राष्ट्रीय सुरक्षा शिल्डवर पश्चिम रेल्वेची मोहोर
By admin | Updated: April 27, 2017 00:22 IST