लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: शहरातल्या वायू प्रदूषणाचा प्रश्न जटिल होत असून, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये मुंबईतील वायू प्रदूषण चिंताजनक होते, असा निष्कर्ष वातावरण फाउंडेशनने काढला आहे. मुंबईत हवेचे समाधानकारक दिवस फार कमी आहेत. रोजच हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक मध्यम आणि वाईट या श्रेणीत नोंदविण्यात येत आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने निर्धारित केलेल्या पीएम २.५च्या मानकांपेक्षा अनेक ठिकाणी प्रदूषणाची उच्च पातळी नोंदविली गेली. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये उच्च प्रदूषण पातळीमुळे हवा गुणवत्ता संकटात आली. त्यामुळे पालिकेला १ जानेवारीला ग्रॅप-४ (ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन - स्टेज ४) लागू करावे लागले. शहरात हे प्रथमच घडल्याचे फाउंडेशनचे म्हणणे आहे.
मॉनिटरिंग डेटा काय सांगतो?
मुंबईत ३० पैकी १२ ठिकाणी नोव्हेंबर आणि डिसेंबर दरम्यान ६० टक्क्यांपेक्षा जास्त दिवस प्रदूषणाची पातळी अधिक होती.
प्रदूषणाचा वाढता ताप
- नोव्हेंबर आणि डिसेंबरमधील ६१ निरीक्षण दिवसांपैकी ५० दिवस १० पेक्षा जास्त ठिकाणी एकाचवेळी जास्त प्रदूषण होते.
- १२ ठिकाणी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये ६० टक्क्यांपेक्षा जास्त दिवस प्रदूषण होते.
- बोरिवली पूर्व आणि मालाड पश्चिम येथे ९० टक्के निरीक्षण दिवस, तर बीकेसी आणि कुलाबा येथे ८७ टक्के निरीक्षण दिवस प्रदूषण होते.
- नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सर्वाधिक प्रदूषण पातळी नोंदविली गेली.
बोरिवली पूर्व आणि मालाड पश्चिम येथे ९० टक्के निरीक्षण कालावधीत हवा धोकादायक होती. बीकेसी आणि कुलाब्यासारख्या प्रमुख भागांमध्ये ८७ टक्के निरीक्षण दिवसांमध्ये हवा असुरक्षित होती.- भगवान केसभट, संस्थापक, वातावरण फाउंडेशन
वातावरणाबाबतचे निष्कर्ष चिंताजनक आहेत. कारण पीएम २.५ कण फुफ्फुसांमध्ये खोलवर शिरू शकतात. रक्तप्रवाहात प्रवेश करू शकतात. ज्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्यास गंभीर धोका संभवतो. - मोहसिन खान, वातावरण फाउंडेशन