Join us
Daily Top 2Weekly Top 5

चेंबूरकरांसाठी सुसज्ज शाळा

By admin | Updated: August 26, 2014 02:40 IST

चेंबूरमधील ठक्कर बाप्पा कॉलनीत असलेल्या पालिका शाळेची तीन वर्षांपूर्वी मोठी दुरवस्था होती. शाळेची इमारत कोसळण्याच्या अवस्थेत असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण होते

मुंबई : चेंबूरमधील ठक्कर बाप्पा कॉलनीत असलेल्या पालिका शाळेची तीन वर्षांपूर्वी मोठी दुरवस्था होती. शाळेची इमारत कोसळण्याच्या अवस्थेत असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. परिसरातील काही पालकांनी ही व्यथा ‘लोकमत’कडे व्यक्त केली. त्यानुसार ‘लोकमत’ने या शाळेमधील दुरवस्थेचे वृत्त फेब्रुवारी २०११ ला प्रसिद्ध केले होते. त्यानंतर तातडीने या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले होते. आता या ठिकाणी सात मजली सुसज्ज इमारत उभी राहिली आहे. पालिका शाळांमधील घटणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येमुळे पालिका हैराण असतानाच चेंबूरमधील हिंदी शाळेची मोठी दुरवस्था झाली होती. शाळेचे छत निकामी झाल्याने त्यातून पावसाचे पाणी वर्गामध्ये येत होते. त्यामुळे वर्गामधील सर्व जमीनदेखील ओली होत होती. शाळेत बाकांची सोय होती, मात्र सर्व बाके तुटलेल्या अवस्थेत असल्याने विद्यार्थ्यांना जमिनीवर बसूनच शिकावे लागत होते. काही वर्गांमध्ये तर पावसाचे पाणी येत असल्याने विद्यार्थ्यांना कधी कधी व्हरांड्यात बसून अभ्यास करावा लागायचा, तर कधी शेजारी असलेल्या गुजराती शाळेत जाऊन बसावे लागत होते. सात खोल्यांच्या या शाळेमध्ये सकाळी पहिली ते चौथी आणि दुपारी पाचवी ते आठवी असे वर्ग भरत असत. मात्र शाळेत असलेल्या गैरसोयीमुळे दिवसेंदिवस या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली होती. त्यातच शाळेला मुख्याध्यापक नसल्याने शिक्षकांना आहे त्याच परिस्थितीत वर्ग चालवावे लागत होते. अखेर काही पालकांनी शाळेची ही दयनीय अवस्था पाहून ‘लोकमत’शी संपर्क साधला.‘लोकमत’ने तत्काळ पालकांची ही समस्या लक्षात घेऊन २१ फेब्रुवारी २०११ च्या अंकात ‘बाकेही नाहीत अन् मुख्याध्यापकही नाहीत’ असे वृत्त प्रसिद्ध केले. त्यामुळे झोपेतून जाग आलेल्या पालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी तत्काळ या शाळेचे सर्वेक्षण करून नवीन इमारतीचा प्रस्ताव आखला. त्यानुसार माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्या हस्ते १८ डिसेंबर २०११ रोजी शाळेच्या नवीन इमारतीसाठी भूमिपूजन करण्यात आले.तीन वर्षांत पालिकेने या ठिकाणी सात मजली सुसज्ज अशी इमारत ठक्कर बाप्पामधील विद्यार्थ्यांसाठी उभी केली आहे. पूर्वी शाळेतील विद्यार्थांना पाण्याची आणि स्वच्छतागृहाचीदेखील या ठिकाणी सोय नव्हती. मात्र या इमारतीत सर्व सुविधा असल्याने विद्यार्थ्यांसह पालकवर्गामध्येदेखील आनंदाचे वातावरण आहे. महापौरांच्या हस्ते या शाळेच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. (प्रतिनिधी)