Join us
Daily Top 2Weekly Top 5

"सावरकरांच्या गौरव यात्रेचे स्वागत, पण...", मुझफ्फर हुसेन यांचा भाजपवर निशाणा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2023 13:21 IST

केवळ राजकीय फायद्यासाठी अन्य प्रकार करणे, हे स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाचा अपमान करण्यासारखे आहे, असे म्हणत मुझफ्फर हुसेन यांनी भाजपावर निशाणा साधला. 

मीरारोड : ज्यांनी ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले, त्याग केला आहे.  ते सर्व आपल्यासाठी स्वातंत्र्यवीर आहेत व त्यांचा सन्मान राखणे, गौरव करणे आपले सर्वांचे कर्तव्यच आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गौरव यात्रेचे मी स्वागतच करतो. सावरकर हे स्वातंत्र्यवीर होते व त्याच्यावर सर्वांनी गौरव करायला पाहिजे अशी स्पष्ट भावना काँग्रेस नेते मुझफ्फर हुसेन यांनी व्यक्त केली. मात्र, केवळ राजकीय फायद्यासाठी अन्य प्रकार करणे, हे स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाचा अपमान करण्यासारखे आहे, असे म्हणत मुझफ्फर हुसेन यांनी भाजपावर निशाणा साधला.  राज्यात भाजपा व शिवसेना शिंदे गटाने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गौरव यात्रा काढण्यास घेतल्या आहेत . त्या पार्श्वभूमीवर मुझफ्फर यांनी आपली भावना व्यक्त करतानाच भाजपा व सरकारवर टीकेची झोड उठवली. सर्वोच्च न्यायालयाने देखील राजकारणातील धर्माच्या वापरा बाबत गंभीर निरीक्षण नोंदवले आहे. देशाचे संविधान संपवून पुन्हा मनुवाद लादण्याचा भाजपाचा खरा अजेंडा आहे. सर्वोच्च न्यायालयात ओबोसीचा डेटा जाणीवपूर्वक भाजप सरकारने दिला नाही, कारण त्यांना आरक्षण द्यायचे नाही. त्यांना सर्वच आरक्षण संपवून टाकायचे आहे. सामान्य लोकांना शिक्षण, नोकरीमध्ये आरक्षण द्यायचे नाही आहे. क्रिमीलेअर बाबत सुद्धा दलित समाजावर अन्याय चालवला आहे असा आरोप मुझफ्फर हुसेन यांनी केला . 

आज राज्यातील जवळपास सर्वच पालिकांच्या मुदती संपून देखील निवडणूक होऊ दिल्या जात नाहीत . सरकार हुकूमशाही करत असून न्याय यंत्रणा सुद्धा स्वतःच्या हुकूमाखाली आणू पाहत आहे . गुजरातच्या स्थानिक  न्यायालयाचे राहुल गांधी यांच्या विरोधात जे आदेश आले आहेत ते दबावाखाली आले आहेत असेच स्पष्ट मत आहे .  अदानी कडे लाखो करोडोंची संपत्ती आली कुठून ? या घोटाळ्याच्या चौकशीसाठी संसदेच्या संयुक्त समितीची मागणी राहुल गांधी यांनी लोकभेत केल्याने भाजपा सरकार अडचणीत सापडले . त्यामुळे दबावतंत्र वापरण्यासाठी सरकारने गांधी यांचे सदस्यत्व रद्द केले आहे, असे मुझफ्फर हुसेन म्हणाले .   

टॅग्स :मीरा रोड