Join us
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी/चिपळूण डबलडेकरचे जिल्ह्यात स्वागत

By admin | Updated: August 22, 2014 23:18 IST

गणपती पावला : खेड, चिपळूण, रत्नागिरी रेल्वे स्थानकात प्रवासी, नागरिकांची गर्दी

रत्नागिरी/चिपळूण : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर नव्याने सुरु करण्यात आलेल्या डबलडेकर या वातानुकुलीत रेल्वे गाडीचे आज (शुक्रवारी) सकाळी प्रथम खेड स्थानकात व नंतर ११.४५ वाजता वालोपे (चिपळूण) रेल्वे स्थानकावर आगमन होताच जोरदार स्वागत करण्यात आले. ही गाडी या मार्गावर प्रथमच धावणार असल्याने प्रवाशांमध्येही आनंदाचे व उत्साहाचे वातावरण होते. रत्नागिरी स्थानकात दुपारी दीड वाजता डबलडेकर पोहोचली. ही गाडी सुरू झाल्याने गणपती पावला, अशी प्रतिक्रिया व्यक्त झाली. चिपळुणात गाडी आल्यानंतर वरिष्ठ स्टेशनमास्तर अरविंद मोहळकर, सहाय्यक स्टेशनमास्तर राहुल रिसबूड, सेक्शन इंजिनिअर आर. आय. पाटील आदींसह कोकण रेल्वेच्या अन्य कर्मचाऱ्यांनी या गाडीचे स्वागत केले. लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ५.३० वाजता सुटलेली ही डबलडेकर करमाळी येथे जाऊन परत फिरणार आहे. डबलडेकर रेल्वेची या मार्गावर चाचणी केल्यानंतर ही गाडी कधी धावणार याची उत्सुकता या मार्गावरील प्रवाशांमध्ये होती. मुख्य सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर मध्य रेल्वेने गणेशोत्सवासाठी सोडण्यात येणाऱ्या स्पेशल गाड्यांमध्ये या गाडीचा समावेश असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार ही गाडी सुरु झाली आहे. दि. २४, २६, २८, ३० आॅगस्ट व दि. १, ३, ५, ७, ९ सप्टेंबर दरम्यान ही गाडी मुंबई येथून सुटणार असल्याचे सांगण्यात आले. प्रीमियम एसी डबलडेकर गाडीला ठाणे, पनवेल, खेड, चिपळूण (वालोपे), रत्नागिरी, कणकवली, कुडाळ या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. या गाडीला ८ डबलडेकर एसी चेअर कार डब्बे, एक भोजन यान व दोन जनरेटर, गार्ड व्हॅन जोडण्यात आल्या आहेत. वातानुकुलीत गाडीतून प्रथमच प्रवास केलेल्या काही प्रवाशांनी आनंदी व सुखकर प्रवास झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रत्नागिरीपर्यंत या गाडीला ८६५ रुपये तिकीट असल्याने सर्वसामान्यांना ही गाडी परवडणारी नाही, असेही काही प्रवाशांनी सांगितले. रत्नागिरी रेल्वे स्थानकात ही डबलडेकर दुपारी १२ वाजेपर्यंत येणे अपेक्षित होते. मात्र, मध्य रेल्वेच्या चालकाने रोहा येथे आणलेल्या या गाडीला पुढील प्रवासाचे सारथ्य करण्यासाठी चालकाची व्यवस्थाच कोकण रेल्वेने केली नसल्याची बाब पुढे आली. त्यामुळे तब्बल एक तास डबलडेकर गाडी रोहा स्थानकात उभी करून ठेवावी लागली. पहिल्याच फेरीला हा प्रकार घडल्याने प्रवाशांतून नापसंती व्यक्त करण्यात आली. खेडमध्ये डबलडेकरचे आगमन झाल्यानंतर प्रवाशांबरोबरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी या गाडीचे जोरदार स्वागत केले. या गणेशोत्सव काळात ही खास डबलडेकर कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहे. (प्रतिनिधी/वार्ताहर)आरामदायी व सुखकर प्रवास असल्याच्या प्रतिक्रिया.अन्य रेल्वे गाड्यांपेक्षा या गाडीला ५ मिनिटे थांबा.गाडी नियमित सोडायला हवी असा प्रवाशांचा सूर.वातानुकुलीत प्रवासाने खरा आनंद मिळाला.डबलडेकर रेल्वेचा कोकणवासीयांना उपयोग व्हायला हवा.खेड रेल्वे स्थानकातही मनसेतर्फे स्वागत.कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या पहिल्याच दिवशीच्या डबलडेकर रेल्वे गाडीतून प्रवास करण्याचा योग आला. दरम्यान, या गाडीचा प्रवास छान वाटला. गाडीची आतील रचना चांगली व आरामदायी आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना या गाडीचा प्रवास आवडेल, असे मत संदीप कदम (चिपळूण) यांनी व्यक्त केले. त्यांच्याबरोबर महेश पंडीत, सायली तांबे, पारसराजे कदम, वरकराजे कदम यांनीही या गाडीतून प्रवास केल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.तिकीट जास्त असले तरी कोकणवासीय गाडीला नक्कीच पसंती देतील, असे विश्वास कदम म्हणाले. कोकण रेल्वे मार्गावर सुरु करण्यात आलेली ही गाडी कशी आहे, याची पाहणी करण्यासाठी आम्ही आलो आहोत. गाडी छान आहे. मात्र, या गाडीचा उपयोग हा कोकणी माणसाला झाला पाहिजे. कोकणातील जनतेला योग्य न्याय मिळाला नाही तर ही गाडी बंदही करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे, असा इशारा कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी दिला. यावेळी वालोपेचे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र तांबिटकर, वालोपेचे उपसरपंच मंगेश मूरकर, बाबा रेडीज आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.या गाडीचे बुकिंग केवळ इंटरनेटच्या माध्यमातून होत असल्याने प्रगत तंत्रज्ञानाची माहिती नसलेल्या प्रवाशांना तिकीट मिळवणे कठीण होत आहे. मुख्य रेल्वे स्थानकावर तरी तिकीट मिळाले पाहिजे. राजधानी पद्धतीची ही गाडी आहे. तिथे पुढे ही नक्की स्वागत होईल. केवळ सण उत्सवादरम्यानही गाडी सोडण्याऐवजी नियमित सुरु ठेवल्यास या मार्गावरील प्रवाशांची चांगली सोय होईल. याचा विचार कोकण रेल्वे प्रशासनाने करावा, असे मत चिपळूण येथील व्यापारी हिरालाल मेहता यांनी व्यक्त केले.डबलडेकर रेल्वे गाडी ही दादर रेल्वे स्टेशन येथून सोडण्यात यायला हवी. गाडीचे दर हे सर्वसामान्यांना परवडणारेही नाही. ही गाडी छान आहे, अशी प्रतिक्रिया डेरवण येथील प्रवासी सतीश चव्हाण यांनी दिली.कुतुहल... उत्सुकता... उत्कंठा...!डबलडेकर ट्रेन अतिशय आरामदायी अशी आहे. एसी असल्याने प्रवाशांना खूप मजा येणार आहे. या गाडीने आमचे सर उदय बोडस प्रवास करणार होते आणि आम्हालाही ती पाहायची होती म्हणून आम्ही आज रेल्वेस्टेशनला आलो आणि आतील फोटोही काढून घेतले. - रूपाली करमरकर, रत्नागिरीडबलडेकर बस आम्ही बघितली होती. पण, डबलडेकर ट्रेन आम्ही पहिल्यांदाच बघितली. त्यामुळे आम्हाला पाहण्याची उत्सुकता होतीच. खरच खूप छान वाटलं. खूप छान गाडी आहे. मात्र, जनशताब्दी, कोकणकन्या आदी फास्ट गाड्यांपेक्षाही या गाडीचे तिकीट दर खूपच जास्त आहे. त्यामुळे लोकांचा रिस्पॉन्स मिळणे अवघड वाटते.- कश्मिरा राऊत, रत्नागिरीजेवणाची खूप छान सोय आहे. गाडी एसी असल्याने प्रवास करायला खूप मजा येणार आहे. त्यामुळे आम्ही आताच ठरवतोय की कुठेतरी प्रवासाला जायला हवं. पण, तिकीट जास्त आहे ते कमी करायला हवं.- ऐश्वर्या रानडे, रत्नागिरीडबलडेकर गाडी बघण्याची आम्हाला खूप उत्सुकता होती. गाडी खूप छान आहे. आतमध्ये सर्व काही आरमदायी वाटतं. सामान ठेवण्यासाठीही खूप स्पेस आहे. मात्र, तिकीट जास्त वाटतं. त्यामुळे आज या ट्रेनने लोकही खूप कमी गेले. तिकीट कमी केल्यास अधिक लोकांना प्रवास करणे परवडेल.- ममता पाटणकर, रत्नागिरीगाडी एसी आहे. आतमध्ये सर्व काही छान आहे. जेवणाची खूप चांगली सोय आहे. टॉयलेट बाथरूम स्वच्छ आहेत. त्यामुळे प्रवास करायला खूप छान वाटणार आहे. मात्र, या ट्रेनचा प्रवास खूप महागडा होणार आहे. सामान्य माणसाला यातून प्रवास करता यावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने तिकीट दर कमी ठेवायला हवेत.- आकाश कोळवणकर, रत्नागिरीगाडीचा लूक खूप चांगला आहे. कोकणाकरिता ही पहिलीच डबलडेकर गाडी आहे. त्यामुळे ती पाहाण्यात तसेच तिच्यातून प्रवास करण्याचे स्वप्न साऱ्यांचेच असेल. मात्र, त्याचा दर कमी ठेवला तरच सर्वांना हे परवडू शकेल आणि या गाडीचे प्रवासी वाढतील. - चिन्मय कोळवणकर, रत्नागिरीकोकण रेल्वे मार्गावर आज प्रथमच डबलडेकर धावली. वातानुकुलित असलेल्या या गाडीतील बैठक व्यवस्था चांगली आहे. गणेशोत्सवात डबलडेकर सुरू केल्याने या गाडीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. गणेशोत्सवात खासगी आराम बसला हजार ते बाराशे रुपये तिकिट मोजावे लागते. त्या तुलनेत या गाडीचे तिकीट माफक असून, प्रवासाचा वेळही वाचतो. त्यामुळे या गाडीने प्रवास करणे आवडेल. या गाडीतील रचना आकर्षक व आरामदायी असल्याचा अनुभव आला. महेश गोकर्णेकर, रत्नागिरी.