चेतन ननावरे, मुंबईसोने, चांदी आणि मौल्यवान धातूंच्या व्यवसायामध्ये वापरण्यात येणाऱ्या १० मिलीग्रॅम ‘ई’ (एरर) व्हॅल्यू असलेल्या वजनकाट्यांची किमान मर्यादा आता केवळ १ मिलीग्रॅमपर्यंत कमी आली आहे. वैध मापन शास्त्र विभागाच्या या आदेशामुळे ग्राहक आणि प्रसंगी सोनारांची एक तोळे सोन्यामागे २७० रुपयांची बचत होणार आहे. हा नियम सोने, चांदी आणि मौल्यवान धातूंच्या व्यवसायासाठी वापरण्यात येणाऱ्या वजनकाट्यांसाठी लागू करण्यात आला आहे.दरम्यान, ज्वेलरी दुकानदारांना १ एप्रिलपर्यंत त्यांच्या दुकानांतील काटे बदलण्याची मुभा देण्यात आली आहे. सोन्यासारखे मौल्यवान धातू खरेदी करताना दुकानांत वापरण्यात येणारे वजनकाटे योग्य त्या अचूकता वर्गाचे नसल्याच्या तक्रारी शासनाकडे वारंवार दाखल झाल्या होत्या. त्याची दखल घेत ग्राहकांची फसवणूक थांबवण्यासाठी योग्य अचूकतेची उपकरणे आवश्यक असल्याने हे आदेश दिल्याची प्रतिक्रिया विभागाचे नियंत्रक संजय पाण्डेय यांनी दिली.पाण्डेय म्हणाले, तूर्तास तरी कोणत्याही दुकानदार किंवा व्यावसायिकावर कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र १ एप्रिलनंतर ज्या दुकानांत किंवा शोरूममध्ये १ मिलीग्रॅम ‘ई’ व्हॅल्यू असलेले इलेक्ट्रॉनिक वजनकाटे वापरात दिसणार नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. महाराष्ट्र वैध मापन शास्त्र (अंमलबजावणी) नियम, २०११ च्या नियम ४ नुसार प्राप्त झालेल्या विशेष अधिकारांचा वापर करत पाण्डेय यांनी आदेश दिले आहेत. त्याचा फायदा ग्राहक आणि सराफांनाही होणार आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी ही खूशखबर ठरेल.
वजनमाप विभागाचा ग्राहकांना दिलासा
By admin | Updated: March 14, 2015 01:47 IST