Join us

आयुर्वेदिक औषधांच्या नावाखाली शस्त्रविक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 05:42 IST

आयुर्वेदिक औषधांच्या नावाखाली गुन्हेगारांना रिव्हॉल्व्हर, काडतुसांची विक्री करणाºया हकिमाला, गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने गुरुवारी डोंगरीतून अटक केले.

मुंबई : आयुर्वेदिक औषधांच्या नावाखाली गुन्हेगारांना रिव्हॉल्व्हर, काडतुसांची विक्री करणाºया हकिमाला, गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने गुरुवारी डोंगरीतून अटक केले. अब्दुल सत्तार शेख (२९) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ५ अग्निशस्त्रांसह ६७ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.मूळचा बिहारचा रहिवासी असलेला अब्दुल १९९७ मध्ये मुंबईत आला. पायधुनी परिसरात तो राहत होता. सुरुवातीला मिळेल ते काम करून तो उदर्निवाह करत असे. त्यानंतर, एका हकिमाकडे १७ वर्षे काम केले. पुढे स्वत:चा हकिमाचा व्यवसाय सुरू केला. याच आयुर्वेदिक औषधांच्या नावाखाली तो गुन्हेगारांना शस्त्रविक्री करू लागला. त्यातूनही त्याची पैशांची अडचण भरून निघत होती. तो आणखी काही शस्त्रविक्रीच्या प्रयत्नात असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार, खंडणीविरोधी पथकाने सापळा रचून गुरुवारी त्याला अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर, २ गावठी कट्टे, चार पिस्तुली, मॅगझीनसह ६७ जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत. गेल्या दीड वर्षांपासून ही शस्त्रे त्याच्याकडेच होती. न्यायालयाने त्याला २१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्हे शाखा त्याची कसून चौकशी करत आहे.