Join us
Daily Top 2Weekly Top 5

आरे गोळीबार प्रकरणात गायकवाडने पुरविली शस्त्र

By admin | Updated: June 6, 2015 02:09 IST

शिवसेना चित्रपट सेनेचे सरचिटणीस व व्यावसायिक श्रीकांत उर्फ राजू शिंदे यांच्यावर गोळीबारासाठी वापर झालेला शस्त्रसाठा मुख्य आरोपी सुरेश गायकवाड याने पुरवला होता.

मुंबई : शिवसेना चित्रपट सेनेचे सरचिटणीस व व्यावसायिक श्रीकांत उर्फ राजू शिंदे यांच्यावर गोळीबारासाठी वापर झालेला शस्त्रसाठा मुख्य आरोपी सुरेश गायकवाड याने पुरवला होता. त्याने हा साठा ज्याच्याकडून विकत घेतला होता त्याची ओळख पटली असून, पोलीस त्याच्या मागावर आहेत. जोगेश्वरीतून गायकवाडला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली होती. त्यानंतर पुढील तपासासाठी त्याला आरेसब पोलिसांच्या हवाली करण्यात आले तर आरे पोलिसांनी शिंदेंवर गोळ्या झाडणाऱ्या संदीप खैरनार या शूटरसह सतीश मोरे व जितू धीवर अशा तिघांना अटक केली होती. आरोपींकडून एक पिस्तूल, रिव्हॉल्व्हर, ४ मॅगझीन आणि १५ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. हा शस्त्रसाठा गायकवाडने पुरविल्याची माहिती अन्य आरोपींनी पोलिसांना दिली आहे. सोबत हा शस्त्रसाठा त्याने ज्या व्यक्तीकडून घेतला त्याचेही नाव पोलिसांना मिळाले आहे. गायकवाडला ८ जूनपर्यंत पोलीस कोठडीत धाडले. गायकवाड, धीवर, मोरे आणि खैरनार हे तिघे २२ मे २०१५ रोजी शिंदे यांच्यावर हल्ला करून शिर्डीला पसार झाले. शिर्डीत काही दिवस राहिल्यानंतर त्यांनी खेड गाठले. तिथून त्यांनी बोईसर गाठले. मात्र पैसे संपले आणि ते गोरेगाव परिसरात आले आणि पोलिसांच्या तावडीत सापडले.