Join us
Daily Top 2Weekly Top 5

अंध, विकलांग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करू, राज्यपालांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दृष्टीहीन विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी लागणारे वाढीव शासकीय अनुदान, कर्णबधीर व बहुविकलांग केंद्राला लागणारे अर्थसहाय्य, कौशल्याधारित ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : दृष्टीहीन विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी लागणारे वाढीव शासकीय अनुदान, कर्णबधीर व बहुविकलांग केंद्राला लागणारे अर्थसहाय्य, कौशल्याधारित शिक्षण घेणाऱ्या दृष्टीहीन विद्यार्थ्यांना विद्यावेतन मिळवून देण्याबाबत आणि शासन स्तरावर पाठपुरावा करण्याबरोबरच विशेष बी. एड. अभ्यासक्रमाला सामान्य बी.एड. अभ्यासक्रमाप्रमाणे समकक्ष मान्यता देण्याबाबत चर्चा करण्याचे आश्वासन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले आहे.

नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब) या दृष्टीहीन व्यक्तींच्या शिक्षण, प्रशिक्षण व रोजगारासाठी कार्य करणाऱ्या संस्थेतर्फे आयोजित अंधांसाठीच्या अखिल भारतीय ध्वज निधी संकलन मोहिमेचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. दृष्टीहीन व विकलांग व्यक्ती अनेक क्षेत्रात चांगली प्रगती करीत आहेत. मात्र, दिव्यांगांचे प्रश्न सामान्य लोकांपेक्षा भिन्न आहेत. सुदैवाने आपल्या देशात अनेक लोक आणि ‘नॅब’सारख्या संस्था दिव्यांगांसाठी चांगले काम करीत आहेत, असे नमूद करून राज्यपालांनी नॅबला दहा लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.

रस्ते अपघातात मृत झालेल्या व्यक्तींचे डोळे दृष्टीहीन व्यक्तींना विनाविलंब उपलब्ध होण्याबाबत कायद्यात तरतूद करावी, अशी मागणी यावेळी नॅब महाराष्ट्राचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री यांनी केली.