लेडी सिंघम...
मनीषा म्हात्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘मॅडम माझं बाळ हरवलंय हो.. कुठेच सापडत नाही..’ म्हणत तिने पोलीस ठाण्यातच हंबरडा फोडला. बाळ कुठे असेल, कसे असेल, त्याचे काय झाले असेल अशा नानाविध विचारांनी कासावीस झालेली आई आपल्यासमोर बसलेली. हाती कुठलाही पुरावा नाही.. बाळाचा शोध घेण्याचे एक मोठे आव्हान समोर असताना, तिने मात्र धाडसाने अवघ्या ४८ तासांत बाळाचा शोध घेत त्याला सुखरूप आईच्या कुशीत दिले. आपल्या काळजाचा तुकडा पुन्हा जवळ आल्याने आईचे आनंदाश्रू अनावर झाले. ते पाहून पोलीसही भारावले. आम्ही फक्त त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पुन्हा आणण्यासाठी धडपडत असतो, असे पोलीस उपनिरीक्षक उषा खोसे सांगतात. खोसे यांच्याप्रमाणे मुंबई पोलीस दलातील प्रत्येक पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले मिसिंग पथक मोलाची कामगिरी बजाविताना दिसत आहे. अशाच काही पडद्याआड उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पथकातील लेडी सिंघमचा घेतलेला हा आढावा...
......
वयाच्या २७व्या वर्षी तपासाची ‘सेन्चुरी’
उषा खोसे, पोलीस उपनिरीक्षक, मालवणी पोलीस ठाणे...
सातारच्या रहिवासी असलेल्या उषा या आई, बाबा आणि भावासोबत मुंबईत राहतात. ‘नोकरी अशी असावी की, आपल्याला पाहताच लोकांच्या मनात आदर निर्माण होऊन त्यांनी सॅलूट ठोकायला पाहिजे. लहानपणी बाबांंनी सांगितलेले शब्द कानावर पडले आणि तेव्हापासूनच पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बांधून पुढचा प्रवास सुरू झाला. वयाच्या २२व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात पीएसआय परीक्षा उत्तीर्ण होऊन १५ जून २०१६मध्ये खोसे या राज्य पोलीस दलात भरती झाल्या. बोरीवली पोलीस ठाण्यातील पहिल्या पोस्टिंगनंतर ऑक्टोबर २०१९मध्ये त्यांची मालवणी पोलीस ठाण्यात नियुक्ती झाली. तेथे मिसिंग पथकाची जबाबदारी मिळाली. नुकतेच अपहरण झालेल्या एक वर्षाच्या चिमुकल्याला पुन्हा आईच्या कुशीत देण्यात त्यांना यश आले आहे. गेल्या वर्षभरात त्यांनी कुटुंबापासून दुरावलेल्या ९० पैकी ८७ अल्पवयीन मुलांची कुटुंबीयासोबत भेट घडवून दिली. तर या वर्षी पहिल्या दोन महिन्यात दाखल झालेल्या १५ गुन्ह्यांपैकी १३ गुन्ह्यांचा उलगडा करण्यात त्यांना यश आले आहे. तामिळनाडू, उत्तर प्रदेशमधून त्यांनी या मुलांची सुटका केली आहे.