Join us

आम्ही पॉझिटिव्ह : कोविड सेंटर / लसीकरण केंद्र : प्रचंड गर्दी, कामाचा खूप ताण असतानाही डॉक्टरांच्या चेहऱ्यावर कायम हास्य होतं..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मी ज्या पोस्ट कोविड सेंटर लसीकरण केंद्रात लस घ्यायला गेली त्या विभागाचे मुख्य अधिकारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मी ज्या पोस्ट कोविड सेंटर लसीकरण केंद्रात लस घ्यायला गेली त्या विभागाचे मुख्य अधिकारी आहेत डॉ. प्रमोद पाटील. ते स्वतः जातीने लक्ष घालून मला आणि माझ्यासह अनेक लोकांना लस देताना प्रेमाने विचारपूस करीत होते. आमची काळजी घेत होते. ते मला अतिशय कौतुकास्पद वाटलं. कारण प्रचंड गर्दी, कामाचा खूप ताण असतानाही या डॉक्टरांच्या चेहऱ्यावर कायम हास्य होतंच; पण इतरांची ते अतिशय आस्थेनं चौकशीही करीत होते. मग ती व्यक्ती ओळखीची असो किंवा नसो.. असा अनुभव आल्याचे ‘लोकमत’च्या एका महिला वाचकाने सांगितले.

कोविड म्हटले की एक प्रकारची भीती आपल्या सगळ्यांनाच घेरून राहिलेली आहे; मग ते कोविडचे लसीकरण केंद्र असो किंवा कोविडची टेस्ट करायला जाणे असो किंवा कोविडसाठी डॉक्टरांकडून औषधोपचार घेणे. सगळंच भयावह आहे. परंतु अशा वेळी जर एखादा डॉक्टर आपल्याशी प्रेमाने वागत असेल, प्रेमाने बोलत असेल, आपल्याला समजावून सांगत असेल तर... कारण अशा वेळेला आपल्याला हवा असतो प्रेमाचा एक शाब्दिक आधार. जो आपल्याला खूप काही देणारा असतो. कारण आपल्या मनाची अवस्था ही त्या वेळेला अतिशय नाजूक असते. दरम्यान, मला हेदेखील कळले की ते स्वत: कोरोनाशी झुंज देत असतानादेखील फोन बंद न ठेवता, फोन सुरू ठेवून आपल्या पेशंटची कुठेही गैरसोय होणार नाही याची काळजी घेत हाताखाली असलेल्या स्टाफला वारंवार सूचना देत होते. कर्तव्यतत्पर डॉक्टरची जबाबदारी ते अतिशय नेटाने पार पाडत होते. डॉ. प्रमोद पाटील यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद.