लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर हे अंदमानातून परत आल्यानंतर त्यांनी केलेल्या कार्यानुसार आपण वाटचाल करायला हवी. भारताची पुन्हा फाळणी होऊ नये, असे वाटत असेल, पुन्हा मोगलाई यावी, असे वाटत नसेल आणि आपली मुलेबाळे हिंदू म्हणून स्वतंत्र जगावीत, असे वाटत असेल तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मांडलेल्या विचारांचे स्मरण होणे गरजेचे आहे. इतिहासात त्यांचे न ऐकल्याने फाळणी झाली. आता मात्र त्यांचे ऐकले तरच आपल्याला भवितव्य आहे, असे स्पष्ट मत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी व्यक्त केले.
सावरकर स्मारकाने आयोजित केलेल्या वीर सावरकर कालापानी मुक्ती शताब्दी ऑनलाईन व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना, ‘सावरकर और हिंदू संघटन’ या विषयावरील व्याख्यानात रणजित सावरकर यांनी सांगितले की, सावरकरांसोबतच अन्य क्रांतिकारकांनी आपापले काम पूर्ण केले व स्वतःची आहुती दिली. आपण कृतज्ञता व्यक्त करावी, यासाठी हे कार्य केलेले नाही. मात्र, आपण हा इतिहास अभ्यासून कृतज्ञता व्यक्त करायला हवी. आपण चुका लक्षात घेत, त्या पुन्हा होणार नाहीत यासाठी प्रयत्न करायला हवेत. तसे केले तरच आपले भविष्य वाचेल. इतिहासाला विसरून चालणार नाही. त्यापासून आपण धडा घेतला पाहिजे. १९२१मध्ये भारतात मुसलमानांची संख्या २२ टक्के होती. १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले त्यावेळेस ती वाढून ३५ टक्के झाल्याने देशाची फाळणी झाली. आजही सीमेवरून होणाऱ्या घुसखोरीमुळे देशातील मुसलमानांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पुन्हा भारताचे विभाजन होऊ नये, यासाठी इतिहासापासून लोकांनी धडा घेतला पाहिजे.
भारतात सात कोटींपेक्षा अधिक अस्पृश्य होते आणि ते हिंदू नसल्याचे ब्रिटीश मानत होते. तर अन्य हिंदू हे भाषा, जातीपाती यात विभागले होते.
या सर्व स्थितीचा विचार करून सावरकरांनी हिंदुत्वाची परिभाषा निर्माण केली. जी भूमी माझी पितृभूमी आहे, जेथे मी मानतो ते तत्त्वज्ञान, पंथ निर्माण झाला आहे, अशी भूमी मानणारा हिंदू आहे. त्यामुळे आज शीख, बौद्ध वा जैन आदी स्वत:ला हिंदू मानत आहेत. आज हिंदू संघटन म्हणून आपण उभारी घेत आहोत पण अजून ते पूर्ण झालेले नाही. पण आज जे काही दिसते ते सावरकरांनी केलेले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे, असेही ते म्हणाले.
..........................