Join us
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही पण माणूस आहोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:06 IST

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : फादर स्टॅन स्वामींची केलेली स्तुती उच्च न्यायालयाने घेतली मागेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरेगाव-भीमा ...

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : फादर स्टॅन स्वामींची केलेली स्तुती उच्च न्यायालयाने घेतली मागे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणातील दिवंगत आरोपी फादर स्टॅन स्वामी यांच्या मृत्यूपश्चात जामीन अर्जावर सुनावणी घेताना न्यायालयाने गेल्या सुनावणीत त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची स्तुती केली होती. मात्र, शुक्रवारच्या सुनावणीत एनआयएने यावर आक्षेप घेतला. त्यांच्या आक्षेपानंतर न्यायालयाने आपण आपले शब्द मागे घेत आहोत, असे स्पष्ट केले.

५ जुलै रोजी स्टॅन स्वामी यांच्या मृत्यूची बातमी अचानक आली. न्यायाधीशसुद्धा माणूस आहे, पण आम्ही स्वामी यांच्या अटकेबद्दल किंवा तुरुंगवासाबद्दल काहीही बोललो नाही, असे न्या. एस. एस. शिंदे व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने म्हटले.

‘कायदेशीर बाबी वेगळी बाजू आहे, असे मी म्हणालो होतो, पण मी वैयक्तिकपणे काही बोललो आणि त्यामुळे तुम्ही (एनआयए) दुखावला असाल तर मी माझे ते शब्द मागे घेतो. संतुलित राहण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो. आम्ही कधीच वक्तव्ये केली नाहीत. पण मि. सिंग, आम्हीसुद्धा माणूस आहोत आणि अचानक असे काही घडले की...,’ असे न्या. शिंदे यांनी म्हटले.

कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी स्टॅन स्वामी हे वयाने सर्वांत मोठे होते. ५ जुलै रोजी त्यांचा वांद्रे होली फॅमिली रुग्णालयात मृत्यू झाला.