Join us
Daily Top 2Weekly Top 5

पंडित मराठे उद्यान ‘राम’ म्हणण्याच्या मार्गावर

By admin | Updated: May 19, 2014 05:09 IST

बहुतांशी दिवे चोरीला गेलेले, खेळी नवीन पण तुटलेली, जी आहेत

 स्नेहा पावसकर, ठाणे - बहुतांशी दिवे चोरीला गेलेले, खेळी नवीन पण तुटलेली, जी आहेत त्यांची साफसफाई नाही आणि असे असतानाही आहे त्या खेळण्यांमध्ये समाधान मानणारी खेळणारी मुले अशी परिस्थिती पाहायला मिळते ती ठाणे पूर्वेला असलेल्या बालोद्यानात. त्यामुळे पंडित मराठे यांच्या स्मरणार्थ उभारलेले हे उद्यान ‘राम’ म्हणण्याच्या मार्गावर आहे. ते ही ‘लक्ष्मण’ नाव असलेल्या नगरसेवकाच्या दुर्लक्षामुळे. साधारण ५-६ वर्षापूर्वी जिजामाता मार्ग आणि परिसरातील मुलांना खेळण्यासाठी स्थानिकांच्या मागणीवरून हे बालोद्यान उभारण्यात आले होते. सुमारे ९३९ चौरस मीटर जागेत उभारलेल्या या बालोद्यानात घसरगुंडीबरोबरच टनेल स्लोप (बंदिस्त घसरगुंडी), झोपाळे, रोप क्लायम्बिग, चक्री, सी सॉ अशी अनेक खेळणी बसविण्यात आली आहेत. यातील काही खेळणी तुटलेल्या अवस्थेत असून इतर खेळणी धुळीने माखलेली आहेत. खेळण्यांचे तुटलेले भाग आणि कचरा उद्यानाच्याच एका कोपर्‍यात साठवून ठेवण्यात आला आहे. उद्यानात मुलांना बागडण्यासाठी लॉनसुद्धा नाही. तर वॉकिंग ट्रॅकवर उद्यानाच्या आजूबाजूला असलेल्या झाडांच्या फांद्या टाकून ठेवण्यात आलेल्या आहेत. उद्यानाला एक सुरक्षारक्षक असून तो केवळ दिलेल्या वेळेत म्हणजे सकाळी ८ ते १०.३० आणि सायंकाळी ४ ते ८ या वेळेत उद्यान उघडणे आणि त्यानंतर बंद करणे इतकेच काम करतो. या उद्यानाचे उद्घाटन कधी, कुणाच्या हस्ते, कुणाच्या उपस्थितीत झाले याची नोंद असलेली कोनशिलाही उद्यानात लावण्यात आलेली नाही. प्रवेशद्वारावरील कमानीवर लिहिलेले पंडितजींचे नावही अस्पष्ट झालेले आहे. संरक्षक जाळ्यासुद्धा तुटलेल्या असून अनेक लॅम्प शेड व त्यातील दिवेसुद्धा चोरीला गेले असल्याने सायंकाळनंतर उद्यानात अंधार होतो. उन्हाळी सुट्टया सुरू असून आणि जवळपासच्या परिसरात मुलांना खेळण्यासाठी दुसरे कोणतेही बालोद्यान नसल्याने या उद्यानातच अस्वच्छ अवस्थेत असलेल्या खेळण्यांबरोबरच मुलांना खेळावे लागत असल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.