Join us

जलवाहिनीचे ‘कारंजे’

By admin | Updated: April 20, 2015 22:35 IST

एकीकडे राज्यात पाण्याचा दुष्काळ जाणवत आहे तर दुसरीकडे जलवाहिनीला गळती लागण्याने लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचा प्रकार काही ठिकाणी सुरू आहे

तळोजा : एकीकडे राज्यात पाण्याचा दुष्काळ जाणवत आहे तर दुसरीकडे जलवाहिनीला गळती लागण्याने लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचा प्रकार काही ठिकाणी सुरू आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेजवळ असलेल्या आसूड गावातून जाणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीला गेल्या आठ महिन्यांपासून गळती लागली आहे. त्यामुळे पाणी साचून उड्डाणपुलाखाली अक्षरश: तलाव तयार झाला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात गळती होऊनही एमजेपीच्या अधिकाऱ्यांचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. सध्या वातावरणात उष्मा प्रचंड वाढला आहे. राज्याबरोबरच रायगड जिल्ह्यातील बहुतांश सर्वच तालुक्यात पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. ग्रामीण भाग, आदिवासी वाड्यांमधील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. तालुक्यातील हेदुटणे आदिवासीवाडीतील पाणीटंचाईचे वृत्त गेल्या आठवड्यात लोकमतने प्रसिध्द केले होते. असे असताना जलवाहिनी गळतीमुळे एक्सप्रेस वेखाली आसूड गावाजवळ तलाव तयार झाला आहे. एमजेपीच्या वतीने जलवाहिनी दुरुस्तीसाठी महिन्यातून दोन वेळा डागडुजीच्या कामासाठी ब्रेकडाऊन घेतला जातो. त्यामुळे कळंबोली, पनवेल, कामोठेवासीयांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. मात्र दुरुस्ती होऊनही परिस्थिती जैसे थे असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. गळतीमुळे डासांची पैदासही वाढली असून त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)