Join us

टॉवरमध्ये पाण्याचा ठणठणाट

By admin | Updated: October 12, 2015 04:59 IST

अनेक उपोषणे आणि आंदोलने केल्यानंतर शासनाने चुनाभट्टी परिसरात काही गिरणी कामगारांना दोन वर्षांपूर्वी मोठ्या टॉवरमध्ये घरे दिली.

मुंबई: अनेक उपोषणे आणि आंदोलने केल्यानंतर शासनाने चुनाभट्टी परिसरात काही गिरणी कामगारांना दोन वर्षांपूर्वी मोठ्या टॉवरमध्ये घरे दिली. पालिका आणि म्हाडाच्या ढिसाळ कारभारामुळे मात्र या रहिवाशांना सध्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. पालिकेकडून कमी दाबाने पाणी येत असल्याने १५ मजले उतरून रहिवाशांना पाणी भरावे लागत आहे. त्यामुळे शासनाने फसवणूक केल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात येत आहे.चुनाभट्टीतील स्वदेशी मिलच्या जागेवर २००८ साली हा १९ मजली टॉवर बांधण्यास सुरुवात झाली. याच वेळी कंत्राटदाराने पाण्याची पाईपलाईन वर न काढता ती १२ ते १४ फूट जमिनीतच ठेवली. त्यानंतर २०१२ ला लॉटरी पद्धतीने याठिकाणी गिरणी कामगारांना घर देण्यात आली. पहिल्यांदा बोटावर मोजता येतील, इतकेच रहिवाशी या टॉवरमध्ये राहत होते. त्यामुळे वर्षभर या रहिवाशांना पाण्याचा त्रास जाणवला नाही. गेल्या वर्षभरात मात्र येथील सर्व घरांमध्ये रहिवासी आल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाण्याचा तुटवडा होऊ लागला. याबाबत रहिवाशांनी म्हाडा, पालिकेसह येथील स्थानिक आमदार आणि नगरसेवक यांना अनेकदा भेटून हा पाणीप्रश्न सोडवण्याची विनंती केली. मात्र सर्वांकडून केवळ आश्वासनच मिळत असल्याने सध्या या रहिवाशांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे.सध्या केवळ १० ते १५ मिनिटे पाणी मिळत असल्याने रहिवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत पालिकेकडे तक्रार केल्यानंतर सध्या २० टक्के पाणीकपात असल्याचे अधिकारी ऐकवतात. तथापि, या टॉवरला लागून असलेल्या झोपडपट्टीत १२ तास पाणी येत असल्याने आमच्यावरच हा अन्याय का? असा सवाल देखील रहिवाशांकडून विचाराला जात आहे. पालिकेकडून येणारे पाणी पुरत नसल्याने काही दिवस याठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांनी पैसे काढून टँकर मागवला. यासाठी महिन्याला ३५ ते ४० हजार रुपये मोजावे लागत होते. येथे राहणारे सर्वजण गरीब गिरणी कामगार आहेत. त्यामुळे आम्ही एवढे पैसे कुठून आणणार? असा सवालही विचारला जात आहे. त्यामुळे काही रहिवाशांनी घरांना टाळे ठोकून गाव गाठले आहे. तर काही रहिवाशी अन्य परिसरातून पाणी भरताना दिसतात. म्हाडा आणि पालिकेने आमचा प्रश्न १५ दिवसांत सोडवावा, अशी रहिवाशांची मागणी आहे. अन्यथा पालिका आणि म्हाडा कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.