Join us  

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! आता झटपट प्रवास करा 'वॉटर टॅक्सी'तून; १२ मार्गांवर लवकरच सेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2021 1:01 PM

Water Taxi In Mumbai: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर करण्यासाठी लवकरच नव्या मार्गाचा म्हणजेच जलमार्गाचा वापर करण्यास सुरुवात होणार आहे.

Water Taxi In Mumbai: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर करण्यासाठी लवकरच नव्या मार्गाचा म्हणजेच जलमार्गाचा वापर करण्यास सुरुवात होणार आहे. मुंबईतील महत्वाकांक्षी 'वॉटर टॅक्सी'ची सेवा आता मे महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू होणार आहे. (Water taxis to be launched on 12 routes by May check out the halts here)

मुंबईत एकूण १२ मार्गांवर 'वॉटर टॅक्सी'ची सेवा सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री मनसुख मांडविय यांनी दिली आहे. मुंबई ते नेरुळ, बेलापूर, वाशी, ऐरोली, रेवस, कारंजा, धरणमतर, कान्होजी आंग्रे बेट आणि ठाणे अशा मार्गांवर वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय बेलापूर ते ठाणे आणि गेटवे ऑफ इंडिया, वाशी-ठाणे आणि गेटवे ऑफ इंडिया यामार्गावरही 'वॉटर टॅक्सी'ची सुविधा मे महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू होणार आहे.वॉटर टॅक्सी सेवा खासगी कंपन्यांच्या माध्यमातून देणार आहे. यात एका बोटीत १४ ते ४५ जणांना एकावेळी प्रवास करता येईल अशी आसन क्षमता असणार आहे. 'वॉटर टॅक्सी' सुविधेमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे आणि ट्राफिकच्या समस्येतून सुटका होणार आहे. 

"वॉटर टॅक्सीची सुविधा ज्या मार्गांवर सुरू केली जातेय. तिथंला प्रवासाचा वेळ सध्या ४० मिनिटं ते २ तास ४५ मिनिटं इतका प्रचंड आहे. वॉटर टॅक्सीमुळे हा प्रवास फक्त कमीत कमी १५ मिनिटं ते १ तासावर येणार आहे", असं केंद्रीय मंत्री मनसुख मांडविय यांनी दिली. याशिवाय डिसेंबर २०२१ पर्यंत आणखी चार मार्गांवर रो-रो सेवा देखील सुरू केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

मुंबईत सद्या मुंबई ते मांडवा अशी रो-रो सेवा सुरू आहे. या सेवेला प्रचंड प्रतिसाद देखील मिळतो आहे. केवळ २० आठवड्यांमध्ये रो-रो सेवेतून १ लाखाहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे. तर २० हजारांहून अधिक वाहनांचा यातून प्रवास झाला आहे. 

येत्या काळात मुंबई ते नेरुळ, मुंबई ते कारंजा, मुंबई ते मोरा आणि मुंबई ते रेवस अशा चार मार्गांवर रो-रो सेवा सुरू केली जाणार आहे. यामुळे मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे.  

टॅग्स :मुंबईजलवाहतूक