मोखाडा : तालुक्यात पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले असून २७ गावे आणि ४५ पाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करुन आदिवासींची तहान भागवली जात आहे. मे अखेरपर्यंत यात आणखी वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे.तालुक्यात दरवर्षी पाणी टंचाई निर्माण होते. डिसेंबरपासून येथील आदिवासींची पाण्यासाठी भटकंती सुरू होते. सध्याच्या स्थितीत तर तालुक्यातील अनेक गाव-पाड्यातील विहीरी कोरड्या पडल्याने नागरिकांना तास्नतास टँकरची वाट बघावी लागते आहे. दरवर्षीच टंचाई असतानाही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना मात्र केली जात नसल्याने संतापाचे वातावरण आहे.जलस्वराज्य योजना, शिवकालीन टाक्यांची योजना, रोजगार हमी योजनेंतर्गत विहिरी बांधण्याच्या अनेक योजना आहे. परंतु याचा पाहिजे तसा फायदा नागरिकांना होताना दिसत नाही. काम कमी आणि भ्रष्टाचार जास्त, अशी स्थिती येथे आहे. तालुक्यात ५ मोठी मोठी धरणे आहे. यात मुबलक पाणीसाठा आहे. मात्र योग्य नियोजन नसल्याने पाण्यासाठी भटकंती मात्र अद्यापही थांबली नाही.भौगोलिक दृष्ट्या तालुका दरीखोऱ्यात विखुरलेला असल्याने प्रशासनाने निश्चित केलेल्या पाणी साठ्यापासून प्रत्यक्ष ठिकाणपर्यतचे अंतर २५ कि. मी. पेक्षा अधिक आहे. शिवाय आसे, स्वामीनगर, धामोडी, कारेगाव या गावातील लोकसंख्या अधिक असल्याने टँकरने पाणीपुरवठा करूनही प्रत्येकांना पाणी मिळत नसल्याची स्थिती आहे.(प्रतिनिधी)
२७ गावे आणि ४५ पाड्यांना टँकरने पाणी
By admin | Updated: May 17, 2015 23:43 IST