वसई : फेब्रुवारी अजून संपत नाही तोवरच वसई - विरारमध्ये पाणीटंचाई उग्र स्वरूप धारण करू लागली आहे. येत्या ४ महिन्यांत या पाणीटंचाईची धग अधिकाधिक तीव्र होणार आहे. राज्यशासनाचा नाकर्तेपणा यास जबाबदार असून १८५ द. ल. लि. पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक असलेले अर्थसहाय्य तसेच जलवाहिन्या टाकण्यासंदर्भात आवश्यक त्या परवानग्या देण्यात आल्या नसल्याने ही योजना आणखी २ ते ३ वर्षे रखडण्याची शक्यता आहे. सध्या ग्रामीण भागात विहिरीतील पाण्याची पातळी खोल गेली असून ग्रामस्थांना केवळ बोअरींगचा आधार आहे तर शहरी भागातील नागरिकांना टँकरचाच आधार आहे.सध्या शहरी भागातील नागरीकांनी आपली पाण्याची गरज भागवण्यासाठी टँकरचा आधार घेतला आहे. परंतु टँकरवाल्यांनी नागरीकांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. टँकरमागे त्यांनी भाव वाढवल्यामुळे अनेक गृहनिर्माण संस्था अडचणीत आल्या आहेत. पूर्वी पाणीटंचाई सुरू झाली की तहसीलदार टँकरमालकांची बैठक बोलावून दर ठरवून देत असत. ही प्रथा आता बंद झाल्यामुळे टँकरच्या दरावर कोणाचेही नियंत्रण नाही. तसेच हे टँकरवाले दूषित पाण्याचा पुरवठा करण्यात असल्यासंदर्भात कारवाई करण्यासाठी प्रशासनाकडे कोणतीही सक्षम यंत्रणा नाही. वसई-विरार शहरी व ग्रामीण भागाला उसगांव, पेल्हार, शिरवली, पांढरतारा व सूर्या योजनेतून पाणी पुरविले जाते. गेल्यावर्षी पावसाचे प्रमाण योग्य राहिल्यामुळे हे सर्व जलाशय तुडुंब भरले होते. परंतु आता त्यातील पाण्याची पातळी खालावल्याने महानगरपालिका प्रशासनाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. शहरी भागात ३ दिवसाआड पाणी येते. विरार पश्चिमेस बोळींज भागात ४ ते ५ दिवसापासून पाणीच न आल्यामुळे महिलावर्ग हवालदिल झाला आहे. सर्वाधिक बिकट परिस्थिती नालासोपारा शहरात असून पाण्याविना लोकांचे सध्या हाल होत आहेत. भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेवून महानगरपालिकेने १८५ द. ल. ली. पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मात्र ही संपूर्ण योजना सरकारी लालफितीत अडकून पडली आहे. या योजनेसाठी मिळणारे केंद्रीय अर्थसहाय्य बंद झाल्यामुळे योजनेचे भवितव्य अडचणीत आले आहे. यापूर्वी अनेक विकासकामांना अर्थसहाय्य देणाऱ्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने याप्रश्नी पुढाकार घ्यावा अशी मागणी होत आहे. तसेच या योजनेच्या जलवाहिन्या टाकण्यासाठी आवश्यक त्या जमीनीसंदर्भात शासनाने त्वरीत निर्णय देणे आवश्यक आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या, उसगांव व पेल्हार या तीन धरणापैकी पेल्हार हे धरण सुमारे ४० ते ५० वर्षे जुने असून या धरणातील पाण्याचे झरे मृत झाले आहेत. त्यात प्रचंड गाळ साठला आहे. त्यामुळे नालासोपारा शहराला पूर्ण क्षमतेने पाणी मिळू शकत नाही. सूर्याचे पाणी प्रचंड प्रमाणात असूनही ते उचलण्याची क्षमता मनपाकडे नाही. (प्रतिनिधी)
वसई-विरारमध्ये पाणीटंचाई
By admin | Updated: February 23, 2015 22:31 IST