Join us

पालिकेच्या तोंडचे ‘पाणी’ पळाले

By admin | Updated: January 26, 2015 00:26 IST

शहरातील नळजोडणीधारकांनी महापालिकेचे तब्बल ३ कोटी ३७ लाख रुपयांची पाणीपट्टी थकवली आहे. यात ३६७ मोठे थकबाकीदार

नामदेव मोरे, नवी मुंबईशहरातील नळजोडणीधारकांनी महापालिकेचे तब्बल ३ कोटी ३७ लाख रुपयांची पाणीपट्टी थकवली आहे. यात ३६७ मोठे थकबाकीदार असून, अनेकांकडे लाखो रुपयांचे बिल थकले असून पोलिसांसह शासकीय कार्यालयांचाही समावेश आहे. यामुळे महसुलाची जुळवाजुळव करताना पालिका प्रशासनाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. देशात सर्वात स्वस्त पाणी नवी मुंबई महानगरपालिका देत आहे. ५० रुपयांमध्ये ३० हजार लिटर पाणी दिले जात आहे. ३० हजार लिटरपेक्षा जास्त पाणी वापरणाऱ्यांना ४.७५ पैसे प्रमाणे बिल आकारण्यात येत आहे. शहरातील बहुतांश ठिकाणी चोवीस तास पाणीपुरवठा सुरू असून इतर परिसरामध्येही मुबलक पाणी दिले जात आहे. पाणी स्वस्त दिले जात असतानाही अनेक ग्राहक वेळेत पाणी बिल भरत नाहीत. महापालिका प्रशासनही सर्वसामान्य ग्राहकांनी एक महिन्याचे बिल थकविले तरी त्यांना पाणीपुरवठा खंडित करण्याची नोटीस देते. परंतु जे वर्षानुवर्षे पाणी बिल भरत नाहीत त्यांच्यावर मात्र ठोस कारवाई होत नाही. थकबाकीदारांविषयी माहिती मिळविली असता तब्बल ३ कोटी ३७ लाख ५० हजार ९१२ रूपये थकबाकी शिल्लक आहे. यामध्ये ३६७ जण मोठे थकबाकीदार आहेत. यामध्ये काहींचा आकडा लाखो रुपयांच्या घरामध्ये आहे. मोठ्या थकबाकीदारांमध्ये पोलीस व इतर काही शासकीय आस्थापनांचा समावेश आहे. पोलिसांकडून थकबाकी वसूल करण्यासाठी नवा फॉर्म्युला शोधण्यात आला आहे. अतिक्रमण विरोधी मोहीम राबविण्यासाठी महापालिका प्रशासन पोलीस बंदोबस्त घेत असते. बंदोबस्तासाठी द्यावे लागणारे पैसे पाणी बिलातून कमी करून घेतले जात असल्याने पोलिसांकडील थकबाकी कमी होऊ लागली आहे.शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांमधील भांडणामुळेही अनेक ठिकाणी पाणी बिल थकले आहे. अशा ठिकाणी माणुसकीच्या दृष्टीने पाणीपुरवठा सुरू ठेवावा लागत आहे. शासकीय आस्थापनांकडील वसुली करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. अनेक मोठ्या थकबाकीदारांनी बिल जास्त आहे किंवा इतर कारणांमुळे बिले थकविली आहेत.या सर्वांच्या सुनावण्या घेऊन प्रश्न मार्गी लावण्याची मागणी होऊ लागली आहे. मागील पाच वर्षांमध्ये २१२ जणांची नळजोडणी खंडित करण्यात आली आहे. परंतु सर्वसामान्य नागरिकांवर ज्याप्रमाणे कारवाई होते त्या प्रमाणात मोठ्या थकबाकीदारांवर मात्र केली जात नसल्याची खंत नागरिक व्यक्त करत असून प्रशासनाने थकबाकी वसुलीसाठी कडक भूमिका घेण्याची मागणी होऊ लागली आहे. याशिवाय चोरी करून पाणी वापरणाऱ्यांचाही शोध घेण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे होत आहे.