मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षाचे संभाव्य उमेदवार कसून तयारी करीत असून, प्रतिस्पर्धी संभाव्य उमेदवाराला चारीमुंड्या चीत करण्यासाठी अनेकांचा जोर पाणी प्रश्नावर राहणार आहे. विशेषत: पूर्व उपनगरासह पश्चिम उपनगरातील झोपडीधारकांना होणारा अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा; या प्रश्नी संभाव्य उमेदवार एकमेकांवर कुरघोडी करण्यास सरसावले असून, याचा काहीसा प्रत्यय पूर्व उपनगरातील गोवंडी आणि मानखुर्द येत आहे.मुंबईला दररोज ३ हजार ७५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. या पाणीपुरवठ्यापैकी २५ ते ३० टक्के पाणी हे गळती व चोरीमध्ये वाया जाते. महत्त्वाचे म्हणजे मुंबईत सुमारे ६५० दशलक्ष लीटर गळतीमध्ये आणि १४० दशलक्ष लीटर पाणी चोरीमध्ये वाया जात आहे. सद्य:स्थितीचा विचार केला तर अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरी, मालाड, भांडुप, घाटकोपर, अंधेरी पश्चिम, विलेपार्ले पश्चिम, दहिसर, कुर्ला, गोवंडी, मानखुर्द आणि मुलुंडमधील रहिवाशांना काही प्रमाणात का होईना पाणी प्रश्न भेडसावतो आहे. लोकप्रतिनिधींनी पाणीप्रश्न सोडविण्याचे आश्वासन कित्येकवेळा दिले आहे. मात्र अद्यापही पाणी प्रश्न जैसे थेच आहे.विशेष म्हणजे लोकप्रतिनिधींनी पाणी प्रश्नावर जेवढा आवाज उठवला; तेवढेच कष्ट महापालिका प्रशासनाने पाणी प्रश्न सोडविण्यासाठी घेतले आहेत. मात्र पाणीमाफियांमुळे ‘जलसंकटा’चा प्रश्न बिकट असून, झोपड्यांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. झोपडपट्ट्यांत पाण्याच्या चोरीचे प्रमाण अधिक आहे. जलवाहिन्या फोडत पाण्याची चोरी होत असल्याचे समोर आले आहे. परिणामी, जलवाहिन्यांमध्ये सांडपाणी शिरून पाणी दूषित होत आहे. पाणी चोरी, गळती व दूषित पाणीपुरवठा रोखण्यासाठी महापालिकेने कामे हाती घेतली आहेत. मात्र अद्यापही त्याचा म्हणावा तसा निकाल हाती आलेला नाही. आता मुंबईला महापालिका निवडणुकीचे वेध लागले असून, फेब्रुवारी महिन्यात येथील निवडणुका पार पडणार आहेत. तत्पूर्वी राजकीय पक्षांमध्ये रंगलेल्या राजकीय कुरघोडीदरम्यान पाणीप्रश्न मुख्यत्वे चर्चिला जाणार आहे. विशेषत: पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील झोपड्यांतील पाणी प्रश्न मिटविणे हे प्रमुख आव्हान राजकीय पक्षांच्या संभाव्य उमेदवारांसमोर असणार असून, याच प्रश्नावरून अर्ध्या मुंबईतील निवडणूक गाजणार आहे. (प्रतिनिधी)
पाणी प्रश्न पेटणार
By admin | Updated: January 23, 2017 05:57 IST