Join us

पाण्यासाठी घोडबंदरकर पालिकेवर

By admin | Updated: December 15, 2014 23:49 IST

ठाण्यातील घोडबंदर रोडवर असलेल्या डोंगरीपाडा परिसरातील शेकडो रहिवाशांना ठाणे महापालिका पाणीपुरवठा करीत नसल्याच्या निषेधार्थ सोमवारी त्यांनी

ठाणे/ घोडंबदर : ठाण्यातील घोडबंदर रोडवर असलेल्या डोंगरीपाडा परिसरातील शेकडो रहिवाशांना ठाणे महापालिका पाणीपुरवठा करीत नसल्याच्या निषेधार्थ सोमवारी त्यांनी ठाणे महापालिका मुख्यालयावर हंडा मोर्चा काढला होता. या मोर्चात महिलांचा मोठ्याप्रमाणात सहभाग होता. यावेळी रहिवाशांनी पालिका आयुक्त असीम गुप्ता यांना निवेदन दिले. विशेष म्हणजे यावेळी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पाणी चोरणाऱ्या रहिवाशांना अधिकृत नळजोडणी देण्याचा आग्रह धरला. मात्र धोरणात ते बसत नसल्याने आयुक्तांनी तो आग्रह धुडकावून लावला. लोकप्रतिनिधींनी आधी तसे धोरण ठरवावे, त्यानंतरच प्रशासन त्याची अंमलबजावणी करेल असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. घोडबंदर भागातील वाघबीळ, कावेसर आणि किंगकाँगनगर भागातील रहिवाशांना पाणीटंचाई भेडसावत आहे. पाणी चोरीमुळे कमी पाणीपुरवठा होत आहे. काही भागात नळ असले तरी त्याला पाणीच नाही. पाण्यासाठी महिलांना विजयनगरी जलकुंभावर जावे लागते. परंतु, असे असेल तरी, पालिका बिले मात्र वेळेवर पाठवत असल्याचा आरोप महिलांनी केला. या आंदोलनानंतरही पालिकेला जाग आली नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा या महिलांनी दिला. या संदर्भात विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे आणि स्थानिक नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्यासमवेत महिलांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांची भेट घेऊन पाणी समस्येचा पाढा वाचला. झोपडपट्यांमधील बेकायदा नळ जोडण्यांमुळे येथील नळधारकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे अशांचा शोध घेऊन त्यांना अधिकृत नळ जोडणी द्यावी, जेणेकरुन या भागात सर्वांना सुरळीत पाणी मिळेल. मात्र तशा प्रकारे झोपड्यांना नियमबाह्य जोडण्या देता येत नसल्याची भूमिका आयुक्त असीम गुप्ता यांनी घेतली. महापालिकेच्या धोरणानुसारच नळजोडण्या देता येऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच या झोपड्यांना नळ जोडणी दिली तर तो संपूर्ण शहरासाठी निर्णय लागू होईल. त्यामुळे शहरातील झोपड्यांमध्ये अशा जोडण्या द्यायच्या असतील तर लोकप्रतिनिधींनी त्यासंदर्भात सर्वसाधारण सभेत निर्णय घ्यावा, असेही त्यांंनी सांगितले. या संदर्भात गटनेत्यांची बैठक घेऊन त्यानुसार धोरण ठरवून तसा प्रस्ताव पालिका तयार करेल आणि सर्वसाधारण सभेपुढे ठेवेल असेही त्यांनी स्पष्ट केले.