Join us  

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2019 4:53 AM

पावसामुळे पीक पाण्यात : खराब झालेल्या कांद्याला मुंबईत दोन रुपये भाव

नामदेव मोरे 

नवी मुंबई : पावसामुळे कांदा शेतामध्येच कुजू लागला आहे. पीक पाण्यात गेल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. नवीन कांदा काढून मार्केटमध्ये पाठविण्यास सुरुवात झाली आहे; परंतु भिजलेला कांदा खराब होऊ लागला असून त्याची दोन ते पाच रुपये प्रतिकिलो दराने विक्री करावी लागत आहे. वाहतुकीचा खर्चही निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होऊ लागले आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरीप हंगामामधील कांदा विक्रीसाठी येऊ लागला आहे. पुणे व नाशिक जिल्ह्यातून प्रतिदिन २० ते २५ ट्रक, टेम्पोमधून हा कांदा येत आहे; परंतु या मालाचा दर्जा खराब असल्यामुळे त्याला अपेक्षित बाजारभाव मिळत नाही. उन्हाळी कांदा होलसेल मार्केटमध्ये ४३ ते ५४ रुपये किलो दराने विकला जात आहे. चांगल्या दर्जाच्या नवीन कांद्यालाही ३० रुपयांपर्यंत दर मिळत आहे; परंतु खराब झालेल्या मालाकडे ग्राहकांनीही पाठ फिरविण्यास सुरुवात केली आहे. बाजार समितीमध्ये आलेल्या मालामध्ये २० ते २५ टक्के माल खराब होत आहे. बुधवारी खराब झालेला कांदा दोन रुपये किलो दराने विकायची वेळ आली. लहान आकाराचा कांदा पाच रुपये किलो दराने विकण्यात आला. बाजार समितीमध्ये ५० किलोची एक गोणी पाठविण्यासाठी ८५ रुपये गाडी भाडे द्यावे लागत आहे. कामगारांची मजुरी व इतर खर्च पकडून जवळपास १०० रुपये खर्च झाला असून, तेवढे पैसेही मालाची विक्री करून मिळू शकले नाहीत. दिवसभर विक्री न झालेला खराब कांदा रात्री फेकून द्यायची वेळ आली आहे.

कांदा उत्पादक शेतकरी स्वत: मार्केटमध्ये उपस्थित राहू लागले आहेत. खराब झालेला माल पाहून अनेक जण व्यथीत झाले आहेत. दोन ते तीन एकरवरील कांदा पाण्यात भिजून कुजला आहे. चांगल्या दर्जाच्या नवीन कांद्याला ३० ते ३२ रुपये बाजारभाव मिळत आहे; परंतु लहान आकाराच्या व खराब झालेल्या मालास ग्राहकच नसल्याची माहिती दिली. कांदा पिकविण्यासाठी घेतलेली मेहनत पाण्यात गेली आहे. याशिवाय कपास, रताळे व इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती शेतकºयांनी दिली.अडीच एकर जमिनीवर कांदा पिकविला होता. पावसामुळे दीड एकर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. उरलेला कांदा विक्रीसाठी मुंबईत घेऊन आलो आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाने योग्य भरपाई द्यावी.- भाऊ खटके,शेतकरी, दौंड-पुणेतीन एकरवरील कांदा भिजला आहे. फक्त सात पिशव्या कांदा काढता आला आहे. कांद्याबरोबर दोन एकरवरील कपास व एक एकरवरील रताळ्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.- सदाशिव लाळगे, मळद, दौंड-पुणे

टॅग्स :नवी मुंबईकांदा