Join us  

दारूखान्यामध्ये ४० वर्षांनंतर मिळाले पाणी; पाणी हक्क समितीचा यशस्वी लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 5:28 AM

रे रोड येथील दारूखाना परिसरामध्ये पाणी हक्क समितीने ४० वर्षे लढा देत ७ जलवाहिन्यांची जोडणी कायदेशीररीत्या मंजूर करून घेतली आहे़ त्यामुळे स्थानिक रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.

मुंबई : रे रोड येथील दारूखाना परिसरामध्ये पाणी हक्क समितीने ४० वर्षे लढा देत ७ जलवाहिन्यांची जोडणी कायदेशीररीत्या मंजूर करून घेतली आहे़ त्यामुळे स्थानिक रहिवाशांना दिलासा मिळाला आहे़दारूखानामध्ये जवळपास ७५० घरे असून त्यातील ३५ घरांमध्ये जलवाहिन्यांची जोडणी करण्यात आली आहे. यापूर्वी येथे पाणी माफिया तसेच राजकीय पक्षाच्या संगनमताने महापालिकेचे पाणी अधिक चढत्या दराने नागरिकांना विकत घ्यावे लागत होते. गेल्या वर्षी पालिकेने पाण्याची होणारी चोरी व पाणी अधिकाराची वाढती मागणी लक्षात घेत संबंधितांकडून परवानगी घेऊन ६ कोटी रुपयांची नवीन जलजोडणी दारूखानातील विभागांकरिता मंजूर केली. पाणी हक्क समितीच्या सततच्या आंदोलनामुळे व न्यायालयीन लढाईमुळे दारूखान्यातील स्थानिकांना पिण्याच्या पाण्याच्या अधिकार मिळाला आहे.जलतज्ज्ञ सीताराम शेलार यांनी सांगितले की, मुंबईतील पाण्यापासून वंचित असलेल्या वस्त्यांमध्ये घराघरांत नळ जोडणी पोहोचवण्यासाठी ‘पाणी हक्क समिती’ पाणी हक्कासाठी सातत्यपूर्ण सक्रिय राहील. ४० वर्षांनंतर पहिल्यांदा मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनीवरील कुटुंबांना कायदेशीर नालजोडणीतून हक्काचे पाणी मिळाले. कौला बंदर, दारूखाना, रे रोड येथील रहिवाशांच्या लढ्याला यश आले. अनेकदा अर्ज केले, अर्जांचा पाठपुरावा केला, पाणी खात्यातील कार्यालयीन बैठका घेतल्या, राजकीय वातावरणाच्या दबावाला सामोरे जावे लागले. तेव्हा कुठे समिती आणि रहिवाशांचा विजय झाला. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ज्यांना कामगार म्हणून राबवले गेले; पण मूलभूत अधिकार सांगितले नाहीत. आज तिसरी कामगार पिढी असूनसुद्धा हक्काचे पाणी दिले नव्हते. तेथे ४० वर्षांनी पाणी आले.पाणी लढा...अंधेरी पश्चिमेकडील सिद्धार्थनगरमध्येही ३०० मिलीमीटरची जलवाहिनी कित्येक वर्षांच्या लढ्यानंतर आणण्यात समितीला यश आले आहे. यासंदर्भातील धोरणांबाबत सकारात्मक विचार व्हावा म्हणून समिती सातत्याने महापालिकेच्या जल खात्यासोबत बैठका घेत आहे. कोकरी आगार येथेही जलजोडणी मिळवून देण्याबाबत समितीने मोलाची भूमिका वठवली. आरे कॉलनीमधील गौतमनगरमधील रहिवाशांना पाणी मिळावे म्हणून समितीचा लढा यशस्वी झाला. वडाळा संक्रमण शिबिरातील रहिवाशांना पाणी मिळावे म्हणून आठ महिने काम सुरू होते.

टॅग्स :पाणी