Join us

महापालिकेचा ‘वॉच’ बिघडला!

By admin | Updated: December 6, 2014 00:52 IST

मुख्यालयाच्या द्वारापर्यंत पोहोचलेल्या अतिरेकी हल्ल्यास (२६ नोव्हेंबर २००८) सहा वर्षे उलटली़ मात्र त्या घटनेनंतरही महापालिकेला शहाणपण आलेले

मुंबई : मुख्यालयाच्या द्वारापर्यंत पोहोचलेल्या अतिरेकी हल्ल्यास (२६ नोव्हेंबर २००८) सहा वर्षे उलटली़ मात्र त्या घटनेनंतरही महापालिकेला शहाणपण आलेले नाही़ म्हणूनच आजही ३० टक्क्यांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त आहेत़ तर उर्वरित कॅमेऱ्यांद्वारे रेकॉर्ड झालेल्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी एकच सुरक्षारक्षक असल्याने सुरक्षा व्यवस्थेचे तीनेतराच वाजले आहेत़अतिरेकी हल्ल्यापूर्वीपासूनच पालिका मुख्यालयात चार सीसीटीव्ही कॅमेरे होते़ या कॅमेऱ्यांमुळेच अतिरेकी अजमल कसाबविरोधात पुरावा मिळू शकला होता़ या हल्ल्यानंतर सुरक्षेबाबतची व्यूहरचना आखण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या मिराणी समितीने पालिकेला २०१० मध्ये काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या होत्या़ त्यानुसार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या ३८ पर्यंत वाढविण्यात आली़ सुरुवातीला चांगले चालणारे हे कॅमेरे काही काळानंतर धूसर व नादुरुस्त झाले़ ३८ पैकी २० हून अधिक कॅमेरे बंदच आहेत, असे सूत्रांकडून समजते़ ‘लोकमत’ने यावर अनेक वेळा प्रश्न उपस्थित केल्याने नुकतेच कक्षात सुरक्षारक्षक नेमण्यास सुरुवात झाली, परंतु सुरक्षेसाठी ही व्यवस्था पुरेशी नाही़(प्रतिनिधी)