Join us  

छत्रपती शिवाजी विमानतळाच्या नामांतरासाठी वॉच डॉग फाऊंडेशनची गांधीगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2018 9:06 PM

महाराजांच्या पुतळ्यासमोर 20 फुटांचा बॅनर लावून आंदोलन

मुंबई: छत्रपती शिवाजी विमानतळाच्या नामकरणासाठी वॉच डॉग फाऊंडेशननं गांधीगिरीच्या माध्यमातून आंदोलन सुरू केलंय. विलेपार्ले येथील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ असं आहे. मात्र यामध्ये महाराज या उपाधीचा उल्लेख नाही. याशिवाय विमानतळावर आणि विमानात केल्या जाणाऱ्या उद्घोषणांमध्येदेखील महाराज या उपाधीचा उल्लेख केला जात नाही. त्यामुळे वॉच डॉग फाऊंडेशननं आंदोलन सुरू केलंय. विमानतळाजवळील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नामकरण केलेला 20 फुटांचा मोठा बॅनर वॉच डॉग फाऊंडेशननं लावलाय. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नामकरण करण्यासाठी आणि यामध्ये नसलेला महाराज हा शब्द निर्देशित करावा या मागणीसाठी वॉच डॉग फाउंडेशन या संस्थेचे संचालक अँड. ग्रोडफे पिमेटा व निकोलस अल्मेडा आणि सहार गावातील जनतेनं गांधीगिरी करत पश्चिम द्रुतगती महामार्गावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण केलेला 20 फुटी मोठा बॅनर लावला. जर राज्य सरकारनं येत्या 8 दिवसांमध्ये या विमानतळाचं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नामकरण न केल्यास वॉच डॉग फाउंडेशनचे कार्यकर्ते पश्चिम द्रुतगती महामार्गावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आमरण उपोषणाला बसतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.लोकमतच्या बातम्यांची दखल घेत शिवजयंती दिनी विलेपार्ले पूर्व येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील व सहार येथील वेअर हाऊस येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या डोक्यावर छत्रीच नसल्यामुळे हे दोन्ही पुतळे 365 दिवस ऊन व पाऊस झेलत आहे. जर राज्य सरकार छत्री उभारणार नसेल, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर छत्र शिवसेना उभारेल, अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी केली होती, याचे काय झाले असा सवाल अँड. ग्रोडफे पिमेटा व निकोलस अल्मेडा यांनी केला. लोकमतने सातत्याने हा विषय मांडला असून लोकमतच्या बातमीची दखल घेत महाराजांच्या डोक्यावर छत्र उभारण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे अंधेरी (पूर्व) विधानसभेचे आमदार रमेश लटके यांनी हा विषय एका लक्षवेधी सुचनेद्वारे 2015 साली नागपूर अधिवेशनात मांडला होता. मात्र अजून याची अंमलबजावणी सरकारनं केली नाही, याबद्धल त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं.छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळ समोरील 5 एकर जागेत लंडनच्या ट्रफलगार स्केवरप्रमाणे भव्य पुतळा उभारण्यात यावा. तसेच पश्चिम दुर्तगती महामार्ग व वेअरहाऊस येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर छत्र उभारण्यात येऊन आठवड्यातून एकदा त्यांना हार घालण्यात यावा. जिव्हीकेने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शब्द दिल्याप्रमाणे पश्चिम दुर्तगती महामार्गावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या तळघरात छत्रपती शिवाजी महाराजांचे आकर्षक संग्रहालय उभारावं, अशी मागणी अँड. ग्रोडफे पिमेटा व निकोलस अल्मेडा  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या ई-मेल वरून केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. 

टॅग्स :विमानतळमुंबई