Join us
Daily Top 2Weekly Top 5

कच्चा माल नसल्याने म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शनची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:06 IST

मुंबई : काळ्या बुरशीचे रुग्ण वाढत आहेत. सुमारे पाच राज्यांत या आजाराचे रुग्ण आढळून आले असून, त्यात महाराष्ट्रातील रुग्णांची ...

मुंबई : काळ्या बुरशीचे रुग्ण वाढत आहेत. सुमारे पाच राज्यांत या आजाराचे रुग्ण आढळून आले असून, त्यात महाराष्ट्रातील रुग्णांची वाढ होत आहे. आरोग्यमंत्र्यांनी आधीच स्पष्ट केले की, हे इंजेक्शन ३१ मेनंतर मिळू शकते. तोपर्यंत केंद्राकडे मागणी केली आहे. मात्र, अँपिटॉरेंसीन बीच्या उत्पादनासाठी लागणारा कच्चा मालच नसल्याने या इंजेक्शनची राज्यात वानवा आहे.

गंभीर रुग्णांना पुरविण्यात आलेला ऑक्सिजन दर्जाहीन असल्याने काळ्या बुरशीचा आजार पसरला असल्याचा आरोप होत आहे. ऑक्सिजन गुणवत्तेची तपासणी व्हावी, अशी मागणी देखील होत आहे. खासगी रुग्णालयात हे इंजेक्शन आणण्यासाठी नातेवाइकांकडे मागणी केली जात आहे. नातेवाईक देखील इंजेक्शनच्या शोधात फिरत आहेत. मात्र, बाजारात इंजेक्शन नसल्याने कित्येक रुग्ण गर्भगळित झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

महिनाभरापूर्वीपर्यंत हे इंजेक्शन ऑनलाइन देखील विकले जात असल्याचे रुग्णांचे नातेवाईक सांगतात. यावर इंजेक्शनची किंमत ३ हजार असल्याचा स्क्रिन शॉटही दाखवला जात आहे. मात्र, सध्या प्रत्यक्षात इंजेक्शनच्या शोथासाठी निघालेल्या नातेवाइकांना दुप्पट किंमत सांगितली जात आहे, असा अनुभव एका रुग्णाच्या नातेवाइकाने सांगितला. इंजेक्शन न मिळाल्याने आता ३१ मेपर्यंत वाट पाहण्याशिवाय रुग्णांना गत्यंतर राहिले नाही.

काळी बुरशी रोगाचे कारण दूषित ऑक्सिजन पुरवठा ?

काळ्या बुरशीचा आजार साथरोग नियमावलीत घेण्यात आला आहे. कोरोनाचे रुग्णवाढ वाढली असताना अशा रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असल्याने इंडस्ट्रियल ऑक्सिजन उत्पादकांना ऑक्सिजन निर्मिती करण्याचे सांगण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्मिती करण्यात आली. त्यामुळे ऑक्सिजन निर्मितीत गुणवत्ता राहिली नसावी. त्यामुळे ऑक्सिजनची लॅब टेस्ट करावी, अशी मागणी ऑल फूड अँड ड्रग लायसन्स होल्डर फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अभय पांडे यांनी केली आहे.