Join us
Daily Top 2Weekly Top 5

कवितेच्या शब्दातून मृत्यूचा अंदाज तर बोलत नव्हता..?

By अतुल कुलकर्णी | Updated: May 17, 2026 08:40 IST

‘निरंजन तेवत असावे...’ : डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या मनाचा अखेरचा शब्दप्रवास

- अतुल कुलकर्णी
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ ही त्यांची ओळख होती. त्यांच्याकडे येणाऱ्याच्या मनावर उमटलेल्या ओरखड्यांवर उपचार करण्याची क्षमता त्यांच्याजवळ होती. मन जाणून घेणारा डॉक्टर, अशी त्यांची ओळख होती. त्या डॉ. आनंद नाडकर्णी यांनी शेवटच्या काही दिवसांत केलेल्या कवितांमधून मात्र त्यांचे मन किती जणांना कळाले हा प्रश्नच आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असताना, मार्च महिन्यात पॅनक्रियाटिक न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर, असे निदान झाले होते. त्यानंतर ते उपचारासाठी मुंबईत एका खासगी रुग्णालयात दाखल झाले. त्या कालावधीत त्यांनी केलेल्या कविता त्यांना त्यांचा दिगंताचा प्रवास दिसत होता, असे वाटावे अशा शब्दरचनेच्या होत्या. 

शेवटची कविता त्यांनी १९ एप्रिल रोजी पोस्ट केली होती. कवितेच्या प्रतिमेसोबत तबला आणि सतार ही वाद्य होती. त्यांनी, 
निरंजन तेवत असावे, तसे तुझे असणे. 
मंद प्रकाशात, मणभर दिलासा. 
मनभर विश्वास देणारे, 
बाकी दिव्यांचा झगमगाट. 
असला तरी नसला तरी. निशब्द.... निरहंकारी....
अशा शब्दांत त्यांच्या आजूबाजूला सुरू असलेला सगळा भावकल्लोळ त्यांनी व्यक्त केला होता. एक मानसोपचार तज्ज्ञ. आपला आजार आपल्या सोबतच संपणार, याची चाहूल तर त्यांना लागली नसेल ?
त्याआधी देखील काही दिवस डॉक्टरांनी वेगवेगळ्या कवितांच्या माध्यमातून बरेच काही सांगण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्या चारच दिवस आधी म्हणजे १५ एप्रिल रोजी त्यांनी व्यक्त केलेल्या भावना केवळ त्यांच्या आजारपणाविषयीच्या नव्हत्या. त्यांनी लिहिले होते, “उत्पत्ती, स्थिती, लय ही त्रिमूर्ती नात्यालाही लागू आहे. आपण मनात काय घोळवत राहणार हा आपला चॉइस. सहवासाचा काळ हा मध्य मानला, तर त्याला सुंदर स्मरणीय बनवण्याचे प्रयत्न सुद्धा आपणच करू. स्मृतीमध्ये त्यानेच रेंगाळले पाहिजे, अशी इच्छा आपोआप थोडीच फळाला येणार..? ताटातूट होण्याच्या शक्यतेने बेजार होण्यापेक्षा, तीच ऊर्जा; सहवास संपन्न करण्यात गुंतवली तर स्मृतीसाठी खरी गुंतवणूक ठरेल...” असे लिहून त्यांनी जी कविता सोबत जोडली होती त्यातून
भेट, सहवास, दूर जाणे कटू 
ठेवावे कुणाला, मध्यबिंदूवर ?
मीलनाची तृप्ती, नवी आस देई, 
दुःख विरहाचे, जळतच राही.
मैत्रीचा प्रवाह, प्रतिमांच्या लाटा, 
निरपेक्ष ठेवू, चित्ताच्या कुशीत. 
राहो आदिअंत, विश्वाच्या अंगणी, 
तुझेमाझे क्षण, फक्त तुझेमाझे.
अशा भावना कवितेतून व्यक्त केल्या होत्या. 
तेव्हा ठाण्याच्या महाराष्ट्र विद्यालय आणि ठाणे कॉलेजच्या विद्यार्थिनी सुखदा जोशी यांनी, ‘आता तुमचे मन शांत झाले असेल, अशी आशा आहे. तुम्ही खूप प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आहात. स्वतःची काळजी घ्या. खूप विचार करू नका. हे जग म्हणजे एक रंगमंच आहे आणि आपण सगळे त्यावरचे कलाकार आहोत. आपापली भूमिका आपल्याला पार पाडायची आहे. “चिन्मय सकल हृदया.”, अशी प्रतिक्रिया दिली होती. ती त्यांनी आवडल्याचेही नमूद केले होते. 
डॉक्टरांना कशाची जाणीव झाली होती, काय समजले होते, हे तेच सांगू शकले असते. मात्र, १२ एप्रिल रोजी रात्री त्यांनी, आपल्या आयुष्यातील काही नाती आपल्यासाठी स्थिर असतात. हे नाते आहे आणि असणारच असा आपला विश्वास कधी अचानक हादरतो. त्या प्रिय व्यक्तीच्या प्रकृतीमध्ये अडचण निर्माण होते आणि आपण खूपच जास्त डिस्टर्ब होऊन जातो. ती ही अवस्था... कसे सामोरे जायचे या परिस्थितीत... असे म्हणत त्यांनी दिलेल्या कवितेतून भावचक्र कोलमडणार आहे. ताटातुटीची शक्यता दिसत आहे. हा बंधच राहणार नसेल तर... या कल्पनेतल्या भीतीने मन आणि बुद्धी कशी भ्रांत होईल, हे व्यक्त केले होते.
विचारी मेंदूला ठावे, नाते किती मौल्यवान. 
भावनेला मात्र नसे, जाण खोल गुंतल्याची.
जेव्हा येई अडचण, अचानक अनिश्चित. 
कोलमडे भावचक्र, शक्यतेत ताटातूट.
नसेल हा बंध जर, राहायचे कैसे ऐसे, 
कल्पनेतल्या भीतीने. मन बुद्धी होई भ्रांत.
जेव्हा त्यांना त्यांच्या आजाराची माहिती आणि स्पष्टता आली होती, तेव्हाच त्यांनी, ६ एप्रिल रोजी “आजाराशी लढाई करण्यापेक्षा मैत्री करावी. जी तलवार चालवायची ती त्यांची, म्हणजे उपचार करणाऱ्या डॉक्टरांची. आपण ढाल हाती घ्यावी. स्वतःची प्रतिकारशक्ती वाढवावी”, असे लिहिले खरे मात्र या पोस्टसोबत दिलेल्या कवितेतून त्यांचा दुर्दम्य आशावाद आणि पुढच्या प्रवासाची लागलेली चाहूल अशा दोन्ही भावना तर व्यक्त केल्या नसतील..?
यत्न सोडू नये कधी, जरी दिसे महामेरू, 
भरोसा राखावा, एका पावलाचा.
वेसण वास्तव, व्यथांचे तांडव, 
लपलेला देव, मैत्रीचा शोधावा.
साऱ्या पेशी गोपगोपी, संस्था झाल्या वेळूबन, 
बासरीचे सूर घेती, वेदनेचे हो चुंबन.
ही कविता वाचून दामोदर लेले यांनी, ‘आज अचानक अशी कविता वाचून काय प्रतिक्रिया द्यावी सुचत नाही’, अशा भावना व्यक्त केल्या होत्या. तर मधुकर पाटणकर यांनी, ‘तुम्हाला दीर्घायुष्य लाभो. तुमच्यासारख्या धन्वंतऱ्याची समाजाला गरज आहे’, असे लिहिले होते.
डॉक्टर नाडकर्णी आज नाहीत. समाजातल्या सर्व प्रकारच्या विचारांना मान्य होणारे सर्वसमावेशक असे व्यक्तिमत्त्व कायमचे काळाच्या पडद्याआड गेले आहे, त्यांची उणीव भरून निघणे केवळ अशक्य आहे. त्यांच्यानंतर दुसरे डॉ. आनंद नाडकर्णी कोण ? या प्रश्नाचे उत्तर पुढची अनेक वर्षे शोधले जाईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Did Poems Foretell Psychiatrist Anand Nadkarni's Death?

Web Summary : Psychiatrist Anand Nadkarni's poems, written during his cancer treatment, hinted at his impending death. His verses reflected acceptance and a philosophical outlook on life and relationships. The poems resonate with themes of parting and finding peace amidst suffering.