Join us
Daily Top 2Weekly Top 5

सावधान तिसरी लाट येतेय; मास्क हाच पर्याय, कोविड सेंटर इतक्यात गुंडाळू नका - डाॅ. संजय ओक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:06 IST

- डाॅ. संजय ओकलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लसीकरणाचा कार्यक्रम जितक्या वेगाने पुढे जायला हवा होता तितका तो ...

- डाॅ. संजय ओक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : लसीकरणाचा कार्यक्रम जितक्या वेगाने पुढे जायला हवा होता तितका तो गेला नाही. त्यात आता नागरिक निर्बंध झुगारून सार्वजनिक ठिकाणी गर्दी करीत आहेत. अशा स्थितीत कोरोनाचा विषाणू नव्या स्वरूपात आपल्यासमोर येत आहे. त्यामुळे तिसरी लाट येण्याची शक्यता अधिक आहे. या लाटेचा सामना करण्यासाठी सर्वांत प्रभावी शस्त्र हे मास्क आहे. त्याला पर्यायच नाही, असे मत राज्याच्या टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर संजय ओक यांनी ऑनलाइन ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.

पहिली लाट ओसरल्यानंतर नागरिक धार्मिक कार्यक्रम, राजकीय सभा, लग्न समारंभ यामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करत होते. परंतु त्याच वेळी विषाणू स्वरूप बदलत होता. दुसऱ्या लाटेत बदललेल्या विषाणूची बाधा तरुणांना मोठ्या प्रमाणात झाली. पहिल्या लाटेत कुटुंबातील एका व्यक्तीस कोरोनाची बाधा होत होती. मात्र, दुसऱ्या लाटेत कुटुंबातील सर्व जणांना बाधा झाली. हे सर्व लक्षात घेता आपण येत्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज होत आहोत, असे डाॅ. ओक म्हणाले.

तिसऱ्या लाटेत ऑक्‍सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी शासन प्रयत्नशील आहे. शहरात असलेले जम्बो कोविड सेंटर्स इतक्यात गुंडाळले जाऊ नयेत. लहान मुले बाधित होण्याची शक्यता असल्याने कोविड सेंटरमधील १०० ते १५० खाटा या ‘चाईल्ड विथ मदर’साठी राखीव ठेवायला हव्यात.

अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल झाल्यानंतर कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. मात्र असे न करता ‘वर्क फ्रॉम होम’नुसार काम करणे गरजेचे आहे. सध्या पावसाळ्यात इतर साथीच्या रोगांसोबत कोरोनादेखील आहे. त्यामुळे एक दिवसापेक्षा अधिक काळ ताप, सर्दी, खोकला राहिल्यास आपण घरात न थांबता कोरोना चाचणी करणे गरजेचे आहे. लस घेतली असली तरीदेखील कोरोना होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे हे नियम पाळले गेलेच पाहिजेत. घरात बनलेला पौष्टिक आहार व व्यायामदेखील चांगल्या इम्युनिटी बूस्टरचे काम करू शकतो, असे डॉ. ओक यांनी सांगितले.

* म्युकरमायकोसिस हा आजार कोरोनामुळे

म्युकरमायकोसिस हा आजार कोरोनामुळे झाला हे सत्य आहे. मधुमेह असलेल्यांना हा आजार होत आहे. स्टेरॉइडच्या अतिवापरामुळे तो अधिक बळावला आहे. त्यानुसार आता जे मधुमेह असलेले कोरोना बाधित रुग्ण आयसीयूमध्ये होते अशा रुग्णांना या आजाराचा संसर्ग झाला आहे का, हे तपासून तो झाला असल्यास त्यावर तातडीने शस्त्रक्रिया करून ती बुरशी काढून अँटिफंगल औषधे देणे हाच त्यावरील उपाय आहे,

- डाॅ. संजय ओक,

राज्याच्या टास्क फोर्सचे प्रमुख

........................