Join us
Daily Top 2Weekly Top 5

वारली चित्रांनी सजले गणेश उद्यान

By admin | Updated: June 12, 2014 01:53 IST

ठाणे महानगरपालिकेच्या बहुतांशी प्रभागांतील उद्यानांची दैना झाली असली तरी काही उद्याने याला अपवाद आहेत. गणेशवाडी परिसरातील गणेश उद्यान त्यापैकीच एक.

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या बहुतांशी प्रभागांतील उद्यानांची दैना झाली असली तरी काही उद्याने याला अपवाद आहेत. गणेशवाडी परिसरातील गणेश उद्यान त्यापैकीच एक. गणेशवाडी येथील गणेश मंदिराशेजारी असलेले हे उद्यान तत्कालीन स्थानिक आमदार राजन विचारे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आले आहे. सुमारे तीन हजार ५०० चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या या उद्यानाचे उद्घाटन ८ फेब्रुवारी २०१३ रोजी शिवसेना ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि महापौर हरिश्चंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. उद्यानाच्या भव्य प्रवेशद्वारालगतच कोनशिला आणि सूचना फलक पाहायला मिळतो. प्रवेश केल्यावर एका बाजूला लहान मुलांसाठी खेळणी बसवण्यात आली आहेत, तर दुसऱ्या बाजूला ज्येष्ठ नागरिकांना विश्रांतीसाठी कट्टा बांधण्यात आला आहे. उद्यानात झाडांबरोबरच वॉकिंग ट्रॅकच्या बाजूने अनेक आकर्षक फुलझाडे लावलेली आहेत. सर्वत्र हिरवेगार लॉनसुद्धा दिसते. विशेष म्हणजे उद्यानाच्या एका कोपऱ्यातील भिंतीवर कमलिनी कर्णबधिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रेखाटलेली वारली चित्रे पाहायला मिळतात. या माध्यमातून कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना अधिकाधिक वाव देण्याचा प्रयत्न केला आहे. उद्यानाला सुरक्षारक्षक आणि माळी असून त्यांच्याकडून दिलेल्या वेळेतच उद्यान खुले-बंद केले जाते. तसेच त्याची स्वच्छताही राखली जात असल्याने उद्यानाचे सौंदर्य टिकून आहे. सायंकाळच्या वेळी तर हे उद्यान गर्दीने फुललेले असते. (प्रतिनिधी)