Join us  

दहिसर येथील वारकरी शिल्पाची तोडफोड केल्याचा वारकरी संप्रदायाने केला निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 3:48 PM

Dahisar News : दहिसर येथील श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरा बाहेरील वारकरी शिल्पाजवळ वारकरी संप्रदायाने टाळाच्या गजरात या घटनेचा जोरदार निषेध केला.

मुंबई - दहिसर पश्चिमेला पुरातन विठ्ठल मंदिर आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या व स्थानिक नगरसेविका म्हात्रे यांनी महापालिकेमार्फत दहिसर प्रभाग क्रमांक ७ मधील येथील विठ्ठल मंदिर चौकाचे नुकतेच सुशोभीकरण केले होते. त्यांनी येथील चौकात वारकरी परंपरेचा आकर्षक देखावा उभारला होता. मात्र येथील वारकऱ्यांच्या पुतळ्याची नासधूस तीन अज्ञात इसमांनी ७ ऑक्टोबर रोजी केली होती. या गोष्टीची एम.एच.बी पोलिसांनी तात्काळ दखल घेत केवळ ३ दिवसातच या आरोपींना अटक केली होती. दारू पिऊन वारकरींच्या मूर्तींची तोडफोड करणाऱ्या तिघांना गेल्या सोमवारी पोलिसांनी तुरुंगात धाडले.

येथील सदर वारकरी शिल्पाची काही समाजकंटकांनी तोडफोड करुन नासधूस केल्याच्या निषेधार्थ वारकरी संप्रदायाकडून निषेध म्हणून वारकरी संप्रदायाने आज आंदोलनाचा पवित्रा घेतला. आज सकाळी दहिसर येथील श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरा बाहेरील वारकरी शिल्पाजवळ वारकरी संप्रदायाने टाळाच्या गजरात या घटनेचा जोरदार निषेध केला. मुंबईतील समस्त वारकरी वर्ग यावेळी हजर होता.  घटनेचे सीसीटीव्ही चे फुटेज पाहता सदर कृत्य जाणूनबुजून केले असे स्पष्ट दिसत आहे. त्यामागील सूत्रधार शोधावा. वारकरी संप्रदाय अत्यंत संयमी व सहिष्णू आहे मात्र त्याचा अस ही अर्थ घेऊ नये की, आमच्या भावनांशी कोणीही छेडछाड करु शकेल. दोषींवर कठोर कारवाई व्हावी या हेतूने आम्ही आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरलो असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री महोदयांनी या गोष्टीकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. सदर प्रभागाच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी उत्तम वारकरी शिल्प उभारले त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो. मात्र काही समाजकंटक असे कृत्य करुन समाजात द्वेष उत्पन्न करत आहे हे कृत्य घडते ही बाब लज्जास्पद आहे. पोलीस यंत्रणा या प्रकरणास योग्य न्याय देतील असा आमचा विश्वास आहे. शासनाने याची योग्य ती दखल घेतली नाही तर याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात दिसतील असे मत वारकरी संप्रदाय युवा मंच महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अक्षयमहाराज भोसले यांनी व्यक्त केले.

पंढरपूर येथील वारकरी फडाचे अनेक अनुयायी, श्रीमंत माऊली प्रतिष्ठाणचे अध्यक्ष विनित सबनीस, नवी मुंबई वारकरी संप्रदायाचे विशाल महाराज फापाळे, वसई विरार वारकरी संप्रदायचे ढगे महाराज, शिवप्रतिष्ठान महाराष्ट्रचे विनित सावंत, अनिकेत सावंत आदी उपस्थित होते. 

टॅग्स :दहिसर