वाडा : वाड्यातील धान्याच्या गोदामांची दुरावस्था झाली असून तेथे उंदीर, घुशींचा वावर असल्याने धान्याची नासाडी होत आहे. गोदामातील फरशीची दुरावस्था झाली असून धान्यात माती पडल्याने धान्याची हानी होत आहे. प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे.वाडा शहरात शासकीय धान्याची साठवणूक करण्यासाठी तीन मोठ मोठी गोदामे आहेत. या गोदामामध्ये प्रशासन तांदूळ, गहू, साखर याची साठवणूक करते. मात्र या गोडाऊनची दुरवस्था झाली असून उंदीर, घुशींनी यावर कब्जा केला आहे. गोदामाचा दरवाजाही चांगल्या अवस्थेत नाही. तसेच प्लॅस्टरही खराब झाले आहे मात्र तहसीलचे प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. या गोदामांची तात्काळ दुरूस्ती करण्याची नागरीकांची मागणी आहे. या संदर्भात वाड्याचे तहसिलदार डॉ. संदीप चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता गोदामाची फरशी बदलविण्याच्या कामाला मंजुरी मिळाली असून ते काम सुरू आहे अशी माहिती त्यांनी दिली. (वार्ताहर)
गोदामाची दुरवस्था
By admin | Updated: May 8, 2015 23:15 IST