Join us  

आयुक्त, विरोधी पक्षांमध्ये जुंपली; गटनेत्यांच्या बैठकीचा वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 4:57 AM

इक्बाल सिंग चहल व्हिडीओ कॉन्फरन्सिंगसाठी आग्रही

मुंबई : लॉकडाऊन खुले करण्यात येत असल्याने चार महिन्यानंतर महापालिकेतील सभांना सुरुवात होणार आहे. सोमवारी आयोजित गटनेत्यांच्या बैठकीत आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा हट्ट धरल्यामुळे विरोधी पक्षांनी या सभेवर बहिष्कार टाकला. परंतु, राज्य सरकारच्या नियमावर बोट ठेवत आयुक्तांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सभा घेण्याची भूमिका पुन्हा एकदा मांडली आहे.मात्र मंत्रालयात हजेरी लावणारे आयुक्त गटनेत्यांच्या बैठकीला घाबरतात का? असा सवाल विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला आहे. मुंबईत मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर पालिकेची महासभा, स्थायी समितीची बैठक व अन्य वैधानिक, विशेष समित्यांच्या बैठका रद्द करण्यात आल्या. गेल्या चार महिन्यांत कोणत्याही समितीच्या बैठका घेण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे पालिकेचे महत्त्वाचे कामकाज खोळंबले आहे. मात्र आता कोरोनाचा प्रसार नियंत्रणात येत असल्याने गटनेत्यांची बैठक व इतर समित्यांची बैठक तातडीने घेण्यात यावी, अशी मागणी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षांनी केली होती.त्यानुसार महापौर किशोरी पेडणेकर यांनी सोमवारी पालिका मुख्यालयातील आयुक्तांच्या कार्यालयाजवळच्या सभागृहात बैठक बोलावली होती. या बैठकीला सर्वपक्षीय गटनेते, अतिरिक्त आयुक्त उपस्थित होते, परंतु पालिका मुख्यालयात असूनही आयुक्त बैठकीला उपस्थित राहिले नाहीत.याउलट त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणार असल्याचे कळवले. यामुळे संतप्त यामुळे संतप्त भाजप काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या गटनेत्यांनी सभात्याग केला बैठकीवर बहिष्कार टाकला.आयुक्तांचे प्रत्युत्तरराज्य शासनाने ३ जुलै २०२० रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार महापालिकेच्या विविध सभा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारेच घेण्यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत. कोरोना विषाणू संसर्ग पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांनी सर्व बैठका केवळ ‘व्हिडीओ कॉन्फरन्स’द्वारेच घ्याव्यात. ही अपवादात्मक परिस्थिती असल्यामुळे महापालिकेच्या सर्व वरिष्ठ अधिकाº्यांच्या बैठकाही ‘व्हिडीओ कॉन्फरन्स’द्वारे घेण्यात येत आहेत. इतर बैठकाही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात येतील, असे आयुक्तांनी स्पष्ट करीत लोकप्रतिनिधीबद्दल पूर्णत: आदर असल्याचेही सांगितले.आयुक्त गटनेत्यांच्या बैठकीला घाबरतात का?महापौरांनी बोलावल्यानंतरही आयुक्त गैरहजर राहणार असतील तर हा महापौरपदाचा अवमान आहे. हा अपमान महापौर आणखीन किती काळ सहन करणार आहेत. सोशल डिस्टन्सिंग पाळूनही गटनेत्यांची बैठक घेता आली असती. मात्र आयुक्त गटनेत्यांच्या बैठकीला सामोरे जाण्यास घाबरतात का? असा प्रश्न विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.